उद्या पहाटे ४५ मिनिटांसाठी पैशांचे व्यवहार अडकणार? SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; UPI बंद असतानाही ‘ही’ सुविधा देणार साथ!

पुणे : मोबाईलवरून अवघ्या काही सेकंदांत पैसे पाठवण्याची सवय असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेने (SBI) यूपीआय सेवेसंदर्भात नवीन सूचना जारी केली आहे. १८ नोव्हेंबरची रात्र संपल्यानंतर म्हणजेच १९ नोव्हेंबरच्या पहाटे बँकेची नियमित यूपीआय सेवा काही काळासाठी प्रभावित होणार आहे. त्यामुळे या वेळेत एसबीआय खात्याशी संबंधित डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना अडचणी येऊ शकतात. मात्र, या काळात ग्राहकांसाठी एक पर्यायी सुविधाही उपलब्ध असणार आहे.
सध्या दूध, भाजीपाला खरेदी करण्यापासून ते ऑनलाइन शॉपिंग आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांपर्यंत यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे बँकेच्या या निर्णयाचा परिणाम अनेक ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारांवर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, एसबीआयने सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना या नियोजित तांत्रिक कामाची पूर्वसूचना दिली आहे.


नेमकी कोणत्या वेळेत यूपीआय सेवा बंद राहणार?

बँकेच्या अधिकृत सूचनेनुसार, १९ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजून १५ मिनिटांपासून ते पहाटे २ वाजेपर्यंत यूपीआय सेवेत देखभालीचे काम केले जाणार आहे. म्हणजेच जवळपास ४५ मिनिटे नियमित यूपीआय व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात. ही वेळ १८ आणि १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीची असल्याने ग्राहकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

या कालावधीत पैसे पाठवणे, क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करणे किंवा ऑनलाइन व्यवहार पूर्ण करणे शक्य न होण्याची शक्यता आहे. देखभालीचे काम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास सेवा लवकर सुरू होऊ शकते, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.
UPI बंद असतानाही व्यवहार करता येणार; काय आहे पर्याय?
नियमित यूपीआय सेवा प्रभावित झाली तरी ग्राहकांसाठी यूपीआय लाईट हा पर्याय उपलब्ध असणार आहे. कमी रकमेच्या दैनंदिन व्यवहारांसाठी ही सुविधा उपयोगी ठरते. यासाठी ग्राहकांना आपल्या बँक खात्यातून आधीच यूपीआय लाईट वॉलेटमध्ये पैसे जमा करावे लागतात. त्यानंतर वॉलेटमधील उपलब्ध रकमेतून छोटे व्यवहार करता येतात.
या सुविधेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक व्यवहारासाठी यूपीआय पिन टाकण्याची गरज नसते. त्यामुळे किरकोळ खरेदी, दुकानांमधील पेमेंट आणि कमी रकमेचे व्यवहार सहज करता येतात.
त्यामुळे एसबीआय ग्राहकांनी महत्त्वाचे आर्थिक व्यवहार शक्यतो देखभालीच्या वेळेपूर्वी पूर्ण करावेत. तसेच यूपीआय लाईट वापरत असल्यास त्यामध्ये पुरेशी रक्कम आधीच जमा करून ठेवावी. ऐनवेळी डिजिटल पेमेंट अडकल्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी बँकेने दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका.
