मतदार यादीच्या पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर! १५ डिसेंबरपर्यंत दावे-हरकतींचा निपटारा, २२ डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध.

पुणे : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार मतदार यादीतील दावे व हरकतींचा निपटारा १५ डिसेंबर २०२६ पर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने १७ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्रासह काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांसाठी सुधारित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.


महाराष्ट्रात नोटीस टप्प्याची सुरुवात ३१ ऑगस्ट २०२६ पासून झाली असून, दावे व हरकतींचा निपटारा करण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२६ आहे. त्यानंतर २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

याशिवाय, मतदारांच्या नोंदणीसाठी गणना अर्ज तयार करणे व छपाई १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे, तर अर्जांचे वितरण व संकलन १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. गणना अर्जांची विल्हेवाट १० डिसेंबरपर्यंत लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या सुधारित वेळापत्रकाची सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती देऊन, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत सर्व माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच राजकीय पक्षांनाही सुधारित वेळापत्रकाची लेखी माहिती देण्यात येणार आहे.
मतदारांनी सुधारित कार्यक्रमाची नोंद घेऊन मतदार यादीतील नोंदणी व संबंधित प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
