तुम्ही सुरुवात केली मी शेवट करणारच!!! आयकर विभागाच्या चौकशीनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांचा स्टेटस ठेवून थेट इशारा…

फलटण : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या स्टेटसची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्या स्टेटसमध्ये रामराजेंनी म्हटलंय, ‘सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच’ या स्टेटसमुळे रामराजेंचा नेमका रोख कोणाकडे याबाबत सातारा जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
रामराजेंचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची पाच दिवस गोविंद दूधमधील अनियमित व्यवहाराच्या अनुषंगाने आयकर विभागाकडून ५ दिवस चौकशी झाली, जी काल म्हणजे ९ फेब्रुवारीला संपली. ही चौकशी संपल्यानंतर आज सकाळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटस वरून हा नेमका इशारा कोणाला याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
आयकर विभागाच्या चौकशीवेळी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणारे रामराजे निंबाळकर चौकशीनंतर आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. येणाऱ्या काळात राजकीय कारकीर्दीत श्रीमंत रामराजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अनुभव पणाला लावून राजकीय भूमिका घेत जशास तसे नव्या संघर्षाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, रामराजे नाईक यांचे मोठे प्रस्थ आहे. स्वभावाने शांत पण वेळ आल्यावर राजकीय पटावर वर्चस्व गाजवणारे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ते नावाजले जातात. यामुळे येणाऱ्या काळात ते कशा पद्धतीने याबाबत बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रात्री आयकर विभाग आपली चौकशी प्रक्रिया पूर्ण करुन त्यांचे पथक निघून गेल्यावर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून पेढे वाटून घोषणाबाजी केली.
दरम्यान, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, कुरोली फुड्स, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, श्रीराम सहकारी साखर कारखाना यासह विविध उद्योगांबाबत चौकशी सुरू होती. त्यांनी भाजपविरोधी भूमिका घेतल्यानंतर हे राजकारण सुरू झाले असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे निंबाळकर समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु चौकशी पार पडल्यानंतर समर्थकांना दिलासा मिळणार आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार हे लवकरच समजेल, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबत रामराजे यांचा संघर्ष असल्याचे सांगितले जात आहे.