महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचे नाव बदलणार? महिला आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

बुलढाणा : महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे. बुलढाणा जिल्ह्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून, या मागणीची दखल घेत प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
बुलढाण्याचे नाव बदलण्याची मागणी का?
महाराष्ट्रात यापूर्वी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतर करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी असून, ते बुलढाणा जिल्ह्यात येते. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीचा सन्मान करण्यासाठी जिल्ह्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ हे नाव देण्यात यावे, अशी भूमिका आमदार श्वेता महाले यांनी मांडली आहे.


मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात बुलढाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन महत्त्वाचाही उल्लेख करण्यात आला आहे. लोणार सरोवर, शेगाव, मेहकरमधील श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य आणि सैलानी बाबा दर्गा यांसारखी महत्त्वाची पर्यटनस्थळे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे ‘राजमाता जिजाऊनगर’ हे नाव देश-विदेशात पोहोचण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.
जिजाऊंच्या योगदानाचा सन्मान करण्याची मागणी
राजमाता जिजाऊसाहेबांच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष घडला. त्यांच्या जन्मभूमीचा गौरव व्हावा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान व्हावा, यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नामांतर ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आमदार श्वेता महाले यांनी ही मागणी सोशल मीडियावरही शेअर केली आहे. बुलढाण्याच्या नामांतराचा निर्णय झाल्यास शिवप्रेमींसाठी हा अभिमानाचा क्षण ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.