९९व्या वर्षी ‘मुंबईचा राजा’च्या विसर्जनाला अनपेक्षित ब्रेक! २२ फुटी बाप्पाच्या समुद्र विसर्जनासाठी परवानगीचा पेच, उद्याची मिरवणूकही संकटात

मुंबई : मुंबईच्या गणेशोत्सवातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मुंबईचा राजा’च्या यंदाच्या विसर्जन सोहळ्याला ऐनवेळी वेगळे वळण मिळाले आहे. मंडळाने ९९व्या वर्षानिमित्त भव्य विसर्जन मिरवणुकीसह २२ फुटी गणेशमूर्तीचे खोल समुद्रात विसर्जन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, आवश्यक प्रशासकीय परवानग्यांचा पेच निर्माण झाल्याने उद्याच्या सोहळ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
यंदा प्रथमच ‘मुंबईचा राजा’ची २२ फूट उंच मूर्ती गिरगाव चौपाटीवर नेऊन बार्ज जहाजाच्या माध्यमातून खोल समुद्रात विसर्जित करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी मंडळाने महाराष्ट्र मेरीटाइमची परवानगी घेतल्याचे सांगितले आहे. मात्र, गिरगाव चौपाटीचा परिसर महापालिकेच्या अखत्यारित असल्याने तेथील विसर्जनासाठी महापालिकेची परवानगीही आवश्यक आहे.

महापालिकेकडून अद्याप परवानगी मिळालेली नसल्याने मुंबई पोलिसांकडूनही विसर्जनासाठी मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नियोजनानुसार सर्व तयारी झालेली असतानाही शेवटच्या टप्प्यावर मंडळासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. परवानगीशिवाय मिरवणूक आणि विसर्जन कसे करायचे, असा प्रश्न मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे.


नियोजनानुसार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता शेवटची महाआरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार होती. लालबाग येथून सुरू झालेली मिरवणूक पारंपरिक मार्गाने गिरगाव चौपाटीकडे जाणार होती. त्यानंतर बार्ज जहाजाच्या साहाय्याने बाप्पाचे खोल समुद्रात विसर्जन करण्याचे नियोजन होते.
मात्र, परवानगी न मिळाल्याने मंडळाने उद्या विसर्जन न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. तरीही पोलिसांकडून सहकार्य मिळून परवानगी मिळते का, यासाठी मंडळाकडून आणखी काही काळ प्रतीक्षा केली जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
‘मुंबईचा राजा’चा यंदाचा उत्सव ९९व्या वर्षात दाखल झाला असून, त्यामुळे यंदाच्या विसर्जनाला विशेष महत्त्व आहे. पारंपरिक मिरवणूक आणि २२ फुटी मूर्तीचे खोल समुद्रातील विसर्जन असा दुहेरी भव्य सोहळा करण्याची तयारी मंडळाने केली होती. मात्र, महापालिका आणि पोलिसांच्या परवानगीच्या मुद्द्यामुळे या नियोजनावर सध्या अनिश्चिततेचे सावट आहे. त्यामुळे अखेर ‘मुंबईचा राजा’चा विसर्जन सोहळा कधी आणि कोणत्या पद्धतीने होणार, याकडे मुंबईकरांसह गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे.