दुष्काळाच्या सावटात श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; ‘रासरंग’चा जल्लोष थांबवून निधी शेतकऱ्यांसाठी वळवणार


डोंबिवली : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदाचा डोंबिवलीतील प्रसिद्ध ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवासाठी होणारा खर्च संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वळवण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डोंबिवलीतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी या उत्सवाचे आयोजन केले जाते. डोंबिवलीसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि परिसरातील हजारो नागरिक या दांडिया उत्सवात सहभागी होत असतात. त्यामुळे नवरात्रोत्सवातील ‘रासरंग’ हे डोंबिवलीतील प्रमुख आकर्षण मानले जाते.

मात्र, यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. वर्षभर मेहनत करून उभे केलेले पीक हातचे गेल्याने शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मोठ्या स्वरूपात उत्सव साजरा करण्याऐवजी त्यासाठीचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय श्रीकांत शिंदे यांनी घेतला आहे.

नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत केली जाणार आहे. कोणत्या भागातील शेतकऱ्यांना आणि कोणत्या स्वरूपात मदत करायची, याचे नियोजन सध्या सुरू आहे. नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन मदत प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवण्याची तयारी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मदतीबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान, दांडिया उत्सव रद्द केला असला तरी नवरात्रोत्सवाची परंपरा खंडित होणार नाही. देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना साधेपणाने करण्यात येणार आहे. दरवर्षी उत्सव साजरा करता येतो; मात्र शेतकरी संकटात असताना त्यांच्यासाठी निधी वळवण्याला प्राधान्य देण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना उत्सवाचा खर्च मदतीसाठी वापरण्याचा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!