गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला अन् कार्यकर्त्यांचा नाच! डॉल्बीच्या तालावर अश्लील अंगविक्षेप, मंडळाच्या कार्यकर्त्यांसह ७ जणांवर गुन्हा दाखल


बारामती : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बीच्या तालावर अश्लील हावभाव आणि बीभत्स अंगविक्षेप केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन महिला नृत्यांगना, डॉल्बी मालक आणि मंडळाच्या चारचाकी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास मतकर वस्ती, माळशिकारेवाडी (कोऱ्हाळे बुद्रुक) येथे ‘श्री साई समर्थ तरुण मंडळा’ची गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी ट्रॅक्टर (क्र. MH 42 Q 2644) आणि ट्रॉली (क्र. MH 42 BS 2120) वर डॉल्बीच्या मोठ्या आवाजात नृत्य सुरू होते.

या मिरवणुकीत नृत्यांगनांकडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव आणि बीभत्स अंगविक्षेप करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मंडळाचे पदाधिकारी या प्रकाराला प्रोत्साहन देत असल्याचेही आढळून आले.

पोलिसांच्या नोटीसनंतरही नियमांचे उल्लंघन

मिरवणुकीपूर्वी मंडळाच्या अध्यक्षांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६८ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीतील अटी व शर्तींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी नृत्यांगना राधा घुले (वय २९), मिनाक्षी रुपनवर (वय ३५), काजल शिंदे (वय २६, सर्व रा. लाकडी, ता. इंदापूर, जि. पुणे), डॉल्बी मालक रोहित हणमंत धुमाळ (रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) तसेच राहुल दिलीप माळशिकारे, दिपक सुभाष माळशिकारे आणि निखील जालिंदर माळशिकारे (सर्व रा. माळशिकारेवाडी, कोऱ्हाळे बुद्रुक, ता. बारामती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २९६, २२३, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ११० व ११७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुलाणी करत आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!