SBI खातेदारांनो, 1 ऑक्टोबरपासून पैसे काढताना जरा जपून! 4 व्यवहारांनंतर प्रत्येक कॅश विड्रॉलवर 15 रुपये शुल्क; ATM, शाखा आणि AePS बाबत मोठा बदल

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या काही खातेदारांसाठी 1 ऑक्टोबर 2026 पासून रोख पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. मात्र, हा बदल सर्व SBI खात्यांना लागू होणार नसून शाखेतून उघडलेल्या Basic Savings Bank Deposit (BSBD) खात्यांवर लागू होईल. या खात्यांमधून महिन्यातील चार मोफत रोख व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 15 रुपये अधिक लागू GST आकारला जाणार आहे. SBIच्या सुधारित सेवा शुल्काच्या माहितीत या बदलाचा उल्लेख करण्यात आला आहे.
चार व्यवहार मोफत, पाचव्यापासून शुल्क

नव्या नियमानुसार BSBD खातेदारांना महिन्यात चार रोख व्यवहार विनाशुल्क करता येतील. या मर्यादेत SBI ATM, इतर बँकेचे ATM, बँकेच्या शाखेतून केलेले रोख पैसे काढणे तसेच AePSद्वारे केलेले कॅश विड्रॉल यांचा समावेश होईल. चार व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पाचव्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक रोख व्यवहारावर 15 रुपये अधिक GST द्यावा लागेल.


AePS वापरणाऱ्यांसाठीही महत्त्वाचा बदल
या नियमातील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे AePS म्हणजेच आधार सक्षम पेमेंट सिस्टीमद्वारे होणारे रोख व्यवहार आता चार मोफत व्यवहारांच्या गणनेत धरले जाणार आहेत. त्यामुळे ATMमधून पैसे काढले नाहीत तरी AePSद्वारे केलेल्या कॅश विड्रॉलमुळे मोफत व्यवहारांची संख्या कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, महिन्यात तीन वेळा ATM किंवा शाखेतून पैसे काढले आणि चौथ्यांदा AePSचा वापर केला, तर चारही मोफत व्यवहार पूर्ण झाल्याचे मानले जाईल. त्यानंतरचा रोख व्यवहार शुल्काच्या कक्षेत येईल.
UPI, NEFT, RTGSवर परिणाम होणार?
ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे डिजिटल पद्धतीने पैसे पाठवण्याच्या व्यवहारांना या रोख व्यवहार शुल्काचा फटका बसणार नाही. UPI, IMPS, NEFT, RTGS यांसारख्या डिजिटल व्यवहारांना रोख पैसे काढण्याच्या चार व्यवहारांच्या मर्यादेत मोजले जाणार नाही. त्यामुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना या बदलामुळे अतिरिक्त रोख व्यवहार शुल्क भरावे लागणार नाही.
BSBD खातं नेमकं कोणासाठी?
SBIचे Basic Savings Bank Deposit खाते प्रामुख्याने मूलभूत बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आहे. या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट नाही आणि मूलभूत RuPay ATM-कम-डेबिट कार्ड विनामूल्य दिले जाते. या कार्डासाठी वार्षिक देखभाल शुल्कही आकारले जात नाही. मात्र, BSBD खाते असलेल्या ग्राहकाला SBIमध्ये दुसरे Savings Bank Account ठेवता येत नाही.
मग SBI ग्राहकांनी काय लक्षात ठेवायचं?
1 ऑक्टोबरपासून BSBD खातेदारांनी ATM, शाखा आणि AePS अशा सर्व माध्यमांतून केलेल्या रोख व्यवहारांची संख्या लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. महिन्यात चार व्यवहारांपर्यंत शुल्क नाही; मात्र पाचव्या व्यवहारापासून प्रत्येक वेळी 15 रुपये अधिक GST आकारला जाईल. दुसरीकडे, डिजिटल माध्यमातून होणारे व्यवहार या रोख मर्यादेपासून वेगळे राहतील.
दरम्यान, SBIने 3 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या बल्क फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरातही ऑगस्टमध्ये बदल केला होता. त्यामुळे SBIच्या ग्राहकांनी आपल्या खात्याच्या प्रकारानुसार लागू असलेले शुल्क आणि व्यवहारांच्या मर्यादा तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.