मोदी आवास योजना यांसारख्या योजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, 3 कोटी घरे बांधणार- अजित पवार

पुणे : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळावा व महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ आज पुण्यातील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ग्रामीण विकास व कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि समाधानाचा असा आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत ज्यांनी आपलं हक्काचं घर उभारलं आहे. अशा हजारो लाभार्थ्यांच्या श्रमाला, संघर्षाला, स्वप्नांना आम्ही सलाम करतो. ही घरं म्हणजे केवळ वास्तू नाही तर, ते स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचं प्रतीक आहे.
आज महाराष्ट्रातील लाखो कुटुंबियांना ही घरं मिळालेली आहेत. देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब यांनी ‘सर्वांसाठी घरं’ या संकल्पनेखाली पंतप्रधान आवास योजना सुरु केली. याच योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या डोक्यावर आता हक्काचं छप्पर मिळणार आहे. गोरगरिबांचं स्वतःचं असं घर असावं, ही बाब मोदी साहेबांनी मनावर घेतली असून देशातील तब्बल ३ कोटी लोकांना घरं उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे.

महा आवास अभियान हे महाराष्ट्राचं एक अभिनव पाऊल आहे. या अभियानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना केवळ घरच नाही तर, त्यासोबत स्वच्छता गृह, उज्ज्वला गॅस जोडणी, शुद्ध पिण्याचं पाणी, वीज, रस्ता आणि मनरेगाच्या अंतर्गत रोजगार यांसारख्या सुविधा देखील राज्य सरकारनं देऊ केल्या आहेत. त्यामुळे ही घरं सर्वार्थानं समृद्ध आणि राहण्यायोग्य बनलेली आहेत.

अन्न, वस्त्र, निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे. ह्या गरजेची पूर्तता करण्यासाठी मोदी साहेबांसोबतच त्यांचं संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ हे कार्यतत्पर आहे. ग्रामीण गृह निर्माण अभियान कुठल्याही परिस्थितीत यशस्वी झालंच पाहिजे, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. घरकुलांची उद्दिष्ट पुरती होण्यासाठी केंद्र सरकारसहित राज्य सरकारच्या वतीनं देखील भरीव असा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
यापुढे महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम विकास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना, मोदी आवास योजना यांसारख्या ग्रामीण गृह निर्माण योजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी खात्री मी देतो.
या योजनांची गावोगावी वेगानं अंमलबजावणी केली गेली पाहिजे, ग्रामीण आवास योजनांना गती मिळावी, यासाठी हे अभियान खऱ्या अर्थानं राबवलं जातंय. आजचा हा पुरस्कार सोहळा म्हणजे या अभियानाला महाराष्ट्रात मिळालेलं मोठं यश आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.