लोणावळ्यात ‘व्हिला’ बुक करताय? सावधान! लोकेशनवर पोहोचताच पर्यटकांना बसतोय जबरदस्त धक्का…

पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. स्वस्त दरात आलिशान व्हिला आणि बंगल्यांचे आमिष दाखवून पर्यटकांना हजारो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष म्हणजे, विश्वास बसावा यासाठी हे भामटे पर्यटकांना ‘लाईव्ह लोकेशन’ही पाठवतात. मात्र प्रत्यक्ष ठिकाणी गेल्यावर कोणताही व्हिला किंवा बंगला अस्तित्वात नसल्याचे समोर येते.
फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आलिशान व्हिलांचे आकर्षक फोटो पोस्ट करून, मार्केट दरापेक्षा कमी किमतीत बुकिंग देण्याचे आमिष दाखवले जाते. बुकिंग निश्चित करण्यासाठी २० ते २५ हजार रुपयांची आगाऊ रक्कम मागितली जाते. पैसे खात्यावर जमा होताच आरोपी मोबाईल बंद करतात किंवा संबंधित पर्यटकांना ब्लॉक करतात.

फसवणूक झालेल्या एका पर्यटकाने सांगितले की, पैसे भरल्यानंतर आम्हाला व्हिलाचे लोकेशन पाठवण्यात आले. मात्र, लोणावळ्यात दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो असता तिथे कोणताही व्हिला नव्हता.” स्थानिक व्यावसायिकांच्या मते, हा स्कॅम लोणावळ्याबाहेरील टोळ्यांकडून चालवला जात असून त्यामुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायाची बदनामी होत आहे.
