टायगर श्रॉफ नव्हे, हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता दुसराच बडा व्यक्ती? आरोपींच्या कबुलीने गोळीबार प्रकरणाला नवं वळण!


मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता एक धक्कादायक वळण समोर येत आहे. टायगर श्रॉफ हाच हल्लेखोरांचा मूळ निशाणा होता की त्यांना मुंबईतील दुसऱ्याच एका बड्या व्यक्तीला संपवायचे होते? आरोपींच्या प्राथमिक चौकशीत दुसऱ्या व्यक्तीला लक्ष्य करण्याचा कट असल्याचा दावा समोर आल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. मात्र, त्या व्यक्तीची ओळख अद्याप उघड झालेली नाही.

या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिस आणि अँटी गँगस्टर टास्क फोर्सच्या मदतीने राजस्थानमधील कोटा येथून तीन आरोपींना ताब्यात घेतले. गोळीबार केल्यानंतर आरोपी मुंबईतून दिल्लीच्या दिशेने पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण आणि रेल्वे प्रवासाच्या माहितीच्या आधारे त्यांचा माग काढला आणि संयुक्त कारवाईत त्यांना पकडले.

गोळीबारानंतर आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पळाले. त्यानंतर ते अंधेरी रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि दुचाकी तिथेच सोडून पुढील प्रवासाला निघाले. घटनास्थळासह अंधेरी स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रणात संशयित दिसून आल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. पोलिसांनी आरोपींची छायाचित्रे आणि रेल्वे प्रवासाची माहिती राजस्थानमधील यंत्रणांना दिली. त्यानंतर कोटा येथे तिघांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींच्या प्राथमिक चौकशीत, आधी ठरवलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे शक्य न झाल्याने टायगर श्रॉफला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आल्याचे वृत्त आहे. टायगरच्या हालचालींचा माग घेण्यासाठी त्याच्या आणि चाहत्यांच्या समाजमाध्यमांवरील चित्रफितींचा वापर करून रेकी केल्याचा दावाही केला जात आहे. बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टायगरला लक्ष्य करण्याची योजना आखली होती, अशी माहितीही समोर आली आहे. या दाव्यांची अधिकृत पुष्टी होणे अद्याप बाकी आहे.

या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याच्या शक्यतेनेही तपास यंत्रणांचे लक्ष वेधले आहे. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितला जाणारा अनिल पंडित हा रेहानच्या संपर्कात होता आणि दोघांनी मिळून कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सिग्नल या संदेशवहन सेवेचा वापर करत असल्याची माहितीही सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. यापूर्वी अभिनेता रोहित शेट्टीशी संबंधित प्रकरणातही या सेवेच्या वापराची चर्चा झाली होती.

आता या हल्ल्याचा सूत्रधार कोण, टायगर श्रॉफऐवजी नेमकी कोणती व्यक्ती हल्लेखोरांच्या निशाण्यावर होती आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या पुढील चौकशीत या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!