प्रियकराच्या एका भेटवस्तूने संसारात वादळ! मोबाईल नवऱ्याच्या हाती लागताच पत्नीने रचला भयंकर कट? गुजरातमधील हत्येने खळबळ

लुणावाडा, गुजरात : प्रियकराने प्रेमाने भेट दिलेला मोबाईल पतीच्या हाती लागला, घरात वाद वाढले आणि त्यानंतर एका कुटुंबाचा शेवट रक्तरंजित घटनेत झाल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये समोर आला आहे. महीसागर जिल्ह्यातील लुणावाडा परिसरात प्रवीणभाई नाथाभाई वणकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी मनीषाबेन आणि तिचा कथित प्रियकर हितेश पटेल यांना अटक केली आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेले कथित प्रेमसंबंध, मोबाईलवरून होणारे वाद आणि हत्येच्या कटाचा पोलिसांनी केलेला उलगडा यामुळे या घटनेची चर्चा सुरू आहे.

तीन वर्षांचे प्रेमसंबंध; मोबाईलमुळे संशय बळावला
पोलिसांच्या तपासानुसार, मनीषाबेन आणि हितेश पटेल यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हितेशने मनीषाबेनला मोबाईल भेट दिला होता. हा मोबाईल प्रवीणभाई यांच्या हातात लागल्यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होऊ लागले. या वादातूनच प्रवीणभाई यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. हत्येच्या साधारण आठवडाभर आधीपासूनच या कटाची तयारी सुरू होती, अशी माहिती तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.


रात्री घरात लपून बसला, झोपेत असताना केला हल्ला
गरिया गावाच्या हद्दीत प्रवीणभाई यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होण्यास सुरुवात झाली. घटनेची माहिती मिळताच कोठंबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नसल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती आणि इतरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला.
पोलिसांच्या दाव्यानुसार, घटनेच्या रात्री प्रवीणभाई घराबाहेर गेले असताना हितेश घरात लपून बसला होता. प्रवीणभाई परतल्यानंतर झोपी गेले. त्यानंतर हितेशने त्यांच्यावर काठीने हल्ला केला. प्रवीणभाईंना जाग आल्याने झटापट झाली. हितेशने चादरीने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मनीषाबेननेही पतीवर काठीने हल्ला केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यानंतर कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात प्रवीणभाई यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
हत्येनंतर गुन्हा बाहेरील व्यक्तीने केल्याचा आभास निर्माण करण्यासाठी मृतदेह घरापासून सुमारे २०० मीटर अंतरावर टाकल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी प्रवीणभाई यांच्या मुलाला शोध घेताना मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी मनीषाबेन आणि हितेश पटेल यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर दोघांना अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
मोबाईल भेटीमुळे उघड झालेल्या कथित प्रेमसंबंधातून हत्येचा कट रचल्याचा निष्कर्ष पोलिसांच्या तपासात मांडण्यात आला आहे. मात्र, आरोपींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे. या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.
