आंबेनळी घाटात नेमकं काय घडलं? मध्यरात्रीच्या भीषण अपघातात ८ जणांचा जीव कसा गेला?

पुणे : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला असून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. साताऱ्याकडे परतणाऱ्या आठ तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात होऊन वाहन तब्बल १२०० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत गाडीतील सर्व आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व तरुण कोकणातील हर्णे बीच येथे फिरण्यासाठी गेले होते. दोन दिवस मौजमजा केल्यानंतर शनिवारी रात्री ते साताऱ्याकडे परत निघाले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास आंबेनळी घाटातून जात असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळली.
रविवारी सकाळी बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असता गाडीचा काही भाग जळालेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे अपघातानंतर वाहनाला आग लागली का, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घाटातील धोकादायक वळणे, रात्रीचा अंधार, चालकाला आलेली झोप किंवा समोरून आलेल्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
