एलपीजी ग्राहकांनो लक्ष द्या! ‘हे’ ८ नियम माहिती नसतील तर सिलेंडर मिळण्यात येऊ शकते अडचण


पुणे : घरगुती एलपीजी सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घर बदलणे, शहर बदलणे, गॅस कनेक्शन ट्रान्सफर करणे, नवीन कनेक्शन घेणे किंवा एलपीजीवरून पीएनजीकडे जाणे अशा प्रत्येक प्रक्रियेसाठी काही नियम आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

पीएनजी कनेक्शन सुरू झाल्यानंतर एलपीजी कनेक्शनबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार, घरात पीएनजी कनेक्शन सुरू झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन बंद करणे आवश्यक आहे. एका घरात एलपीजी आणि पीएनजी या दोन्ही गॅसचा अनावश्यक वापर टाळणे आणि गॅस वितरण व्यवस्था अधिक सुरळीत करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.

घर बदलल्यास अशी करा एलपीजी कनेक्शन ट्रान्सफर

घर बदलणाऱ्या ग्राहकांनी सर्वप्रथम आपल्या गॅस वितरकाला नवीन पत्त्याची माहिती देऊन कनेक्शन ट्रान्सफरसाठी अर्ज करावा. यासाठी ओळखपत्र, नवीन पत्त्याचा पुरावा, ग्राहक क्रमांक किंवा गॅस बुक, रेग्युलेटर आणि मूळ कनेक्शन वाउचर यासारखी कागदपत्रे आवश्यक असतात.

जर नवीन घर त्याच गॅस एजन्सीच्या सेवा क्षेत्रात असेल तर केवळ पत्ता अपडेट करून सिलेंडर पुरवठा सुरू ठेवता येतो. मात्र नवीन घर दुसऱ्या सेवा क्षेत्रात असल्यास ट्रान्सफर टर्मिनेशन वाउचर घेणे आवश्यक असते.

दुसऱ्या शहरात जाताना काय करावे?

दुसऱ्या शहरात स्थलांतर करताना ग्राहकांना जुन्या गॅस एजन्सीकडे सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावे लागतात. त्यानंतर एजन्सीकडून टर्मिनेशन वाउचर दिले जाते आणि सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम परत केली जाते.

हे वाउचर आणि आवश्यक कागदपत्रे नवीन शहरातील गॅस एजन्सीकडे जमा केल्यानंतर नवीन एलपीजी कनेक्शन प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर नवीन एजन्सी ट्रान्सफर टर्मिनेशन वाउचरचे ट्रान्सफर सबस्क्रिप्शन वाउचरमध्ये रूपांतर करून नवीन ग्राहक क्रमांक देते.

पीएनजी कनेक्शन वाढवण्यावर सरकारचा भर

देशभरात मागील सहा महिन्यांत 13.4 लाखांहून अधिक पीएनजी कनेक्शन सुरू करण्यात आली आहेत. मात्र सरकारने निश्चित केलेल्या 60 लाख नवीन कनेक्शनच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ही संख्या अद्याप कमी आहे. सुरक्षित आणि पाइप्ड गॅस अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

तज्ज्ञांच्या मते, एलपीजीवरून पीएनजीकडे जाणाऱ्या ग्राहकांनी स्थानिक गॅस वितरकाकडून संपूर्ण प्रक्रिया समजून घ्यावी. तसेच ट्रान्सफरदरम्यान मिळणारी सर्व कागदपत्रे आणि वाउचर सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!