पक्षाचा झेंडा नाही, चिन्हही नाही; रोहित पवारांच्या आंदोलनामागे नेमकं काय शिजतंय? पक्षापासून फारकत की शरद पवारांचीच रणनीती?


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सध्या पक्षाच्या झेंड्याशिवाय आणि चिन्हाशिवाय आंदोलन करत असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पक्षापासून ते दूर जात आहेत का? त्यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागतोय का? असे प्रश्न उपस्थित होत असतानाच रोहित पवारांनी या भूमिकेमागचं कारण स्पष्ट केलं आहे. आपली आंदोलनं कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित नसून ती सामाजिक प्रश्नांसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पक्षाचं नाव किंवा चिन्ह वापरणं टाळत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

रोहित पवारांच्या मते, एखाद्या आंदोलनात पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह दिसल्यास त्या आंदोलनाला राजकीय स्वरूप असल्याचा आरोप होऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि विविध विचारांचे लोक एकत्र यावेत, यासाठी पक्षाची ओळख बाजूला ठेवली जाते. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि पंढरपूरमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झालेल्या आंदोलनातही पक्षाचं चिन्ह वापरलं नव्हतं. आता नागपूरच्या ट्रॅक्टर मोर्चातही हीच भूमिका कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

४ डिसेंबरला शेगावमधून सुरुवात, ९ डिसेंबरला नागपुरात मोर्चा

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार ४ डिसेंबर रोजी शेगाव येथून ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात करणार आहेत. हा मोर्चा ९ डिसेंबरला नागपुरात पोहोचणार आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून उपस्थित केलेल्या १३ मुद्द्यांवर या आंदोलनातून आवाज उठवला जाणार आहे. विशेषतः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, विदर्भ-मराठवाड्यातील शेतीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती यावर सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न असेल.

राज्यातील दुष्काळाची स्थिती १९७२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत असून, त्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून मांडलेले मुद्देच पुढे नेत हा मोर्चा काढला जाणार असल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं.

पक्षात नाराजी की आंदोलनाला स्वतंत्र स्वरूप? शशिकांत शिंदेंनीही स्पष्ट केली भूमिका

रोहित पवार अलीकडे स्वतंत्रपणे आंदोलन करत असल्याने त्यांना पक्षातून पाठिंबा मिळत नसल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे पक्षांतर्गत मतभेद असल्याची चर्चा अधिक रंगली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

रोहित पवारांना स्वतंत्रपणे आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे. पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह वापरल्यास आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळू शकतं; मात्र त्यासाठी पक्षांतर्गत चर्चा होणं आवश्यक आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षाचा विरोध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, नागपूर विधानभवनाच्या पुनर्निर्माणाचं काम पुढील तीन वर्षे चालणार असल्याने या काळात नागपुरात अधिवेशन होणार नाही, असं रोहित पवारांनी नमूद केलं. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनाच्या काळात विदर्भातील प्रश्न सरकारसमोर मांडण्याची संधी महत्त्वाची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता पक्षाचं चिन्ह न वापरता निघणाऱ्या या मोर्चाला किती प्रतिसाद मिळतो आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!