संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर नगरी सजली! १५ हजार चौ. फूटांचे जर्मन हॅगर, स्वागत कमानींनी शहराला सांस्कृतिक रुप..

लोणी काळभोर : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणी काळभोर पूर्णपणे सज्ज झाले असून, शनिवार (११ जुलै) रोजी होणाऱ्या पालखी मुक्कामासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. यंदा वारकऱ्यांच्या सोयीसाठी पालखी तळावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांना अधिक आरामदायी व सुरक्षित वातावरण मिळणार आहे.

पालखी तळावर प्रत्येकी सुमारे १५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे दोन भव्य जर्मन हॅगर मंडप उभारण्यात आले आहेत. या मंडपांमध्ये वारकऱ्यांसाठी मोबाईल चार्जिंग सुविधा, पायांचा थकवा दूर करण्यासाठी फुट मसाजर, स्तनदा मातांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष, तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय पालखी तळाच्या बाहेरील परिसरात महावितरण, वनविभाग, पोलीस, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तहसील प्रशासनाचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहेत. विशेष म्हणजे, महिला वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा विचार करून प्रथमच बंदिस्त स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पालखीच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर आकर्षक स्वागत कमान उभारण्यात आली असून संपूर्ण परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.

या सर्व तयारीची माहिती गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी दिली. यावेळी पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, उपसभापती पुनम गायकवाड, पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, कदमवाकवस्तीचे ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ, विद्यमान उपसरपंच नासिरखान पठाण, माजी सरपंच नंदू काळभोर, पोलीस पाटील प्रियांका भिसे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने केलेली नियोजनबद्ध तयारी लक्षवेधी ठरत असून, लोणी काळभोर वारकरी भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे चित्र दिसत आहे.