पुण्यात पाणी संकट गडद; धरणांतील साठा मर्यादित, जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश…

पुणे : शहर आणि जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. आगामी काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात येत आहे.

सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण समूहात 4.13 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर पिंपरी-चिंचवड आणि मावळ भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 1.65 टीएमसी पाणी शिल्लक आहे. मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय होईपर्यंत या साठ्यावरच अवलंबून राहावे लागणार असल्याने प्रशासनाने दक्षतेचे धोरण स्वीकारले आहे.
शहरातील काही भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे खासगी टँकरची मागणी वाढली असून अनेक ठिकाणी पाण्याच्या दरात वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. वाढत्या खर्चामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, पाणीटंचाईच्या शक्यतेमुळे राजकीय पक्षही सक्रिय झाले आहेत. कमी दरात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वडगाव खुर्द येथील टँकर पॉईंटवरून सवलतीच्या दरात पाणी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे टँकरच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे.

प्रशासनाकडून पाणीसाठ्याचा नियमित आढावा घेतला जात असून परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.