”2 हजार तरुण, एक मंच आणि डॉ. मोहन भागवत; मुंबईत रंगणार नेतृत्वाचा सर्वात मोठा संवाद’


मुंबई : देशाच्या भविष्यातील नेतृत्व घडवणाऱ्या तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी मुंबईत येणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात देशभरातून आलेले सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी होणार असून, Gen Z आणि Gen Alpha पिढीला लोकशाही, नेतृत्व, राष्ट्रनिर्मिती आणि सामाजिक उत्तरदायित्वाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

IIMUN (India’s International Movement to Unite Nations) च्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वार्षिक चॅम्पियनशिप परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात हा बहुचर्चित संवाद होणार आहे. भारतातील विविध राज्यांतील शाळा आणि महाविद्यालयांमधून निवडलेले विद्यार्थी या परिषदेसाठी मुंबईत एकत्र येणार असून, नेतृत्व विकास, जागतिक प्रश्न, सार्वजनिक धोरणे, संवादकौशल्य आणि मुत्सद्देगिरी यांसारख्या विषयांवर विविध सत्रे पार पडणार आहेत.

2011 मध्ये ऋषभ शाह यांनी सुरू केलेल्या IIMUN या संस्थेने गेल्या 15 वर्षांत लाखो विद्यार्थ्यांना जागतिक विचारसरणी, संवादकौशल्य आणि नेतृत्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संस्थेची विशेष बाब म्हणजे तिचे बहुतांश नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी 15 ते 24 वयोगटातील तरुणच करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वाची क्षमता विकसित करण्यासाठी IIMUN हा देशातील प्रभावी युवा मंच मानला जातो.

या व्यासपीठातून घडलेले अनेक विद्यार्थी आज IAS, IPS अधिकारी, लोकप्रतिनिधी, वकील, लेखक, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे यंदाच्या परिषदेलाही देशभरातील युवा वर्गासाठी महत्त्वाचे व्यासपीठ मानले जात आहे.

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. मोहन भागवत यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. बदलत्या काळात तरुणांची जबाबदारी, भारताच्या विकासात युवाशक्तीचे योगदान, मूल्याधिष्ठित नेतृत्व, राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक स्तरावर भारताची वाढती भूमिका यांसारख्या विषयांवर ते मार्गदर्शन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, IIMUN च्या सल्लागार मंडळात उद्योग, न्यायव्यवस्था, राजकारण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. अजय पिरामल, दीपक पारेख, नादिर गोदरेज, डॉ. शशी थरूर, भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि ऑलिम्पियन पी. टी. उषा यांसारख्या मान्यवरांचे संस्थेला मार्गदर्शन लाभत आहे.

देशातील युवा नेतृत्व घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या परिषदेकडे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष लागले असून, डॉ. मोहन भागवत यांच्या संवादातून तरुणांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!