महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ७/१२ वर नाव नसलं तरी मिळणार ‘महिला शेतकरी’ प्रमाणपत्र; अर्ज कसा करायचा?


मुंबई : शेतात रात्रंदिवस मेहनत करूनही शेतकरी म्हणून अधिकृत ओळख आणि हक्कांपासून वंचित राहणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ अंतर्गत महिलांना अधिकृत ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देण्यासाठी कृषी विभागाने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.

विशेष म्हणजे, महिलेच्या नावावर शेतजमीन नसली तरी तिला महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. या प्रमाणपत्रामुळे महिलांना विविध सरकारी कृषी आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.

जमिनीची मालकी नसली तरी महिला शेतकरी होता येणार

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी केवळ जमिनीच्या मालकीचा निकष महत्त्वाचा राहणार नाही. संबंधित महिलेचा शेती किंवा शेतीशी संबंधित कामांमधील प्रत्यक्ष सहभाग हा प्रमुख निकष मानला जाणार आहे. अधिनियमात शेती आणि शेतीपूरक व्यवसायांची व्यापक व्याख्या करण्यात आली आहे.

यामध्ये शेती, बागायती, भाजीपाला उत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधमाशीपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम उत्पादन, फळबाग, एरंडी उत्पादन, अंबाडी लागवड, कृषी-वनीकरण आणि कंपोस्ट निर्मिती यांसह विविध कृषी व शेतीपूरक कामांचा समावेश आहे.

याशिवाय भाडेपट्ट्याने किंवा बटाईने शेती करणाऱ्या महिला, भूमिहीन शेतकरी, भूमिहीन पशुपालक, शेतमजूर, रोपमळा मजूर आणि पशुधारक महिलांचाही महिला शेतकरी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आणि शेती व्यवसायात कार्यरत असलेल्या महिला या प्रमाणपत्रासाठी पात्र ठरू शकतात.

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा?

महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

ग्रामसभेकडून अर्जाची पडताळणी

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ग्रामसभेची भूमिका महत्त्वाची असणार आहे. संबंधित महिलेचा अर्ज ग्रामसभेसमोर ठेवला जाईल. अर्जदार महिला निकषांनुसार शेती किंवा शेतीशी संबंधित किमान एका कामात सहभागी आहे की नाही, याची ग्रामसभेकडून पडताळणी केली जाईल.

ग्रामसभेने अर्जाला मान्यता दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून १५ दिवसांच्या आत महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येईल.

महिला शेतकरी प्रमाणपत्राचे फायदे काय?

महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव नसले तरी शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळण्यास मदत होणार आहे.

तसेच, बँकांकडून कृषी कर्ज मिळवताना या प्रमाणपत्राचा उपयोग होऊ शकतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासही मदत होणार आहे.

याशिवाय पीकविमा, अनुदान आणि इतर कृषी योजनांसाठी पात्रता मिळवणे, कृषी उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण घेणे तसेच बाजारपेठेतील विविध संधी मिळवणे यासाठीही हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!