प्रियकरासोबत राहत होती म्हणून ‘शुद्धीकरण’चा अघोरी प्रकार? झाडाला बांधलं, अमानुष छळ केला अन् व्हिडिओ केला व्हायरल


सुरेंद्रनगर : पतीपासून वेगळं राहून प्रियकरासोबत संसार थाटणाऱ्या विवाहित महिलेचा शोध घेतल्यानंतर तिच्या पतीसह नातेवाईकांनी जे कृत्य केल्याचा आरोप आहे, त्याने गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. ‘शुद्धीकरण’ करण्याच्या नावाखाली महिला आणि तिच्या प्रियकराचा कथित छळ करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहित महिला पतीपासून वेगळी राहत होती आणि आपल्या प्रियकरासोबत राहत होती. ही माहिती मिळाल्यानंतर महिलेचा पती आणि त्याच्या नातेवाईकांनी दोघांचा शोध सुरू केला. अखेर त्यांना शोधून काढल्यानंतर तरुणाला झाडाला बांधल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला काठ्यांनी मारहाण करण्यात आली.

‘शुद्धीकरण’च्या नावाखाली अमानुष प्रकार

मारहाणीनंतर आरोपींनी कथित शुद्धीकरणाच्या नावाखाली तरुणाला सर्वांसमोर महिलेबाबत जबरदस्तीचे कृत्य करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. तरुणाला महिलेचे मूत्र पिण्यास भाग पाडण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काही जणांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर सुरेंद्रनगर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथकं रवाना करण्यात आली.

समुपदेशनानंतर महिलेने सांगितला धक्कादायक प्रकार

शोधमोहीमेदरम्यान पीडित महिला पोलिसांना सापडली. पोलिसांनी तिचे समुपदेशन केल्यानंतर तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत महिलेच्या पतीसह त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले.

या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ शूट करणारे आणि तो सोशल मीडियावर अपलोड करणारे कोण आहेत, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल

सुरेंद्रनगरच्या ए-डिव्हिजन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, मारहाण करून दुखापत करणे, अपहरण आणि लैंगिक अत्याचारासह विविध गंभीर आरोपांचा तपास सुरू आहे.

पोलिसांकडून या प्रकरणातील प्रत्येक आरोपीची भूमिका तपासली जात आहे. तसेच व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारेही तपास पुढे नेला जात आहे. या अमानुष प्रकारातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!