भाजपच्या गोटात खळबळ! कोअर कमिटीतील नेत्यानेच फिरवली पाठ; थेट काँग्रेसमध्ये प्रवेश, इंदापुरात राजकीय समीकरणे बदलणार?

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एकीकडे भाजपकडून विरोधी पक्षांतील नेत्यांना पक्षात घेतले जात असताना दुसरीकडे भाजपमधील नेतेही पक्षाची साथ सोडत असल्याचे चित्र आहे. आता पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये अशीच एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. भाजपच्या कोअर कमिटीमध्ये स्थान असलेल्या मयूरसिंह पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे इंदापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
नेमकं कोण आहेत मयूरसिंह पाटील?

मयूरसिंह पाटील हे इंदापूर तालुक्यातील परिचित राजकीय नाव आहे. भाजपच्या पुणे जिल्ह्यातील संघटनेत त्यांनी काम केले असून, पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. संघटनेतील विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचा राजकीय अनुभव केवळ पक्षापुरता मर्यादित नसून सहकार क्षेत्रातही त्यांचे काम राहिले आहे.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि इंदापूर तालुका दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे शेतकरी, दूध उत्पादक आणि सहकार क्षेत्राशी संबंधित विविध घटकांमध्ये त्यांचा संपर्क आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेश, कोणाची होती उपस्थिती?
२१ नोव्हेंबर रोजी पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत मयूरसिंह पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लहू निवंगुणे आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार यांच्या प्रयत्नांतून हा प्रवेश झाल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे मयूरसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ आहेत. त्यांचे कुटुंबीय संबंधही काँग्रेसच्या राजकारणाशी जोडलेले आहेत. दिवंगत ज्येष्ठ नेते शंकरराव पाटील हे त्यांचे चुलते होते. शंकरराव पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार म्हणून, तर बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.
भाजप सोडण्यामागे काय कारण?
मयूरसिंह पाटील यांनी पक्षप्रवेशावेळी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या तीन पिढ्यांचा काँग्रेसशी संबंध राहिला आहे. काँग्रेसच्या विचारसरणीतच त्यांची जडणघडण झाली. तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे ते भाजपमध्ये गेले होते. भाजपमध्ये कोअर टीममध्ये काम करण्याची संधी आणि मानसन्मान मिळाला; मात्र दोन्ही पक्षांच्या विचारसरणीतील फरक त्यांना जाणवत होता. त्यामुळे पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
इंदापुरात पुढे काय घडणार?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात मयूरसिंह पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडून अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर प्रवीण माने भाजपमध्ये गेले आणि मयूरसिंह पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेची चर्चा होत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालघरमध्ये माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे रायगडमध्ये सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या पार्श्वभूमीवर इंदापुरातील मयूरसिंह पाटील यांचा काँग्रेस प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. आता त्यांच्या माध्यमातून काँग्रेस तालुक्यात संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी कोणती पावले उचलते आणि भाजपकडून या घडामोडीवर काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
