कोल्हापूरनंतर आता बारामतीची चर्चा! माळेगाव कारखान्याने जाहीर केली पहिली उचल, किती आहे दर?

बारामती : महाराष्ट्रात सध्या ऊसदराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊसाला प्रतिटन ३,९०० रुपयांची पहिली उचल देण्याची मागणी करत आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला यश मिळाले असून, कोल्हापूरपाठोपाठ सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनीही प्रतिटन ३,९०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे.
अशातच आता बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्यानेही ऊसदर जाहीर केला आहे. दिवंगत नेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या या कारखान्याच्या दराकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चेअरमन असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या उचलीबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३,९०० रुपयांची पहिली उचल देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चालू गळीत हंगामातील ऊसदराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अशातच पहिली उचल ३,९०० रुपये प्रतिटन निश्चित झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सातारा, सांगलीतही कोल्हापूर पॅटर्न!
यंदाच्या गळीत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी सर्वप्रथम ऊसाला प्रतिटन ३,९०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली होती. त्यानंतर सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांनीही हाच पॅटर्न राबवला. बारामती तालुक्याच्या शेजारी असलेल्या फलटणमधील काही कारखान्यांनीही प्रतिटन ३,९०० ते ३,९११ रुपयांपर्यंत पहिली उचल जाहीर केली.
त्यामुळे साखर पट्ट्यातील महत्त्वाचा तालुका असलेल्या बारामतीमधील कारखाने किती दर जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर माळेगाव कारखान्यानेही प्रतिटन ३,९०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे.
दरम्यान, सध्या शेतकरी विविध अडचणींचा सामना करत आहेत. रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी आणि शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे ऊसाला चांगला दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.
बारामतीमधील साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जात असल्याने येथील कारखान्यांकडून चांगल्या दराची अपेक्षा व्यक्त केली जात होती. माळेगाव कारखान्याने जाहीर केलेल्या पहिल्या उचलीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
