Wadala News : खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडले, दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत…

Wadala News : दोन सख्ख्या भावांचा गार्डनमध्ये खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला आहे. मुंबईच्या वडाळा येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अंकुश आणि आर्जुन आशी या दोन भावांची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, दोघेही रविवारी घरातून बेपत्ता झाले. त्यांच्या पालकांनी पोलिसांत दोन्ही मुलं बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी आणि माझी पत्नी रविवारी काही कामानिमित्त विलेपार्ले येथे गेलो होतो. आमच्या शेजरच्या व्यक्तींनी सांगितले की मुलं घरात नाहीत.

त्यामुळे आम्ही पुन्हा तातडीने घरी परतलो. आम्ही त्या दोघांचा फार शोध घेतला. मात्र ते कुठेच सापडले नाही. शेवटी रात्री पोलिसांत पालकांनी धाव घेतली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी त्यांच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले.
त्यावेळी पोलिसांना त्यांची काहीच माहिती मिळाली नाही.तपास सुरू असतानाच सोमवारी सकाळी मुलांच्या आई-वडिलांना आठवले की, मुलं काही वेळासाठी गार्डनमध्ये खेळायला गेली होती. Wadala News
त्यामुळे ते पाण्याच्या टाकीत तर पडले नसतील? अशी शंका व्यक्त केली. पोलिसांच्या मदतीने पाण्याच्या टाकीत शोध घेण्यात आला. तेव्हा दोघेही पाण्याच्या टाकीत असल्याचे दिसले.
पोलिसांनी तातडीने त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता. ४ ते ५ वर्षांच्या या मुलांचा रात्रीच गुदमरून मृत्यू झाला होता. गार्डनमध्ये एक पाण्याची मोठी टाकी आहे.
या टाकीला झाकण नाही. त्यामुळे यावर प्लास्टीकचा कागद टाकण्यात आला आहे. त्यामुळे खेळत असताना येथे टाकी असल्याचं मुलांच्या लक्षात आलं नसावं आणि ते थेट पाण्यात पडले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.