सोलापूर–पुणे महामार्गावर भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू…

लोणी काळभोर : सोलापूर–पुणे महामार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत बारामतीहून पुण्याकडे निघालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात २१ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.५६ वाजता हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील प्रगती मंगल कार्यालयासमोर घडला.

या अपघातात गौरीशंकर शिवराज सपळे (वय ३५, रा. देवराज देवभूमी, गुनवडी रोड, बारामती) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरीशंकर सपळे हे आपल्या दुचाकीवरून (एमएच ४२ व्हीएल ०३८०) कामानिमित्त बारामतीहून पुण्याकडे जात होते. दरम्यान, कदमवाकवस्ती परिसरात भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने (एमएच १२ वायक्यू ९७६३) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

लोणी काळभोर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.