पुण्यात पाण्याची नासाडी आता महागात पडणार! १० हजारांचा दंड, तिसऱ्यांदा नियम मोडल्यास थेट गुन्हा दाखल

पुणे : राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी पाणीटंचाईचाही सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पिण्याच्या पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार असून तिसऱ्यांदा नियम मोडल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

शहराला वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा व्हावा आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर व्हावा, यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. पाणी कपातीच्या काळात वॉशिंग सेंटर बंद ठेवण्यासह जलतरण तलाव, खासगी उद्याने, बांधकामे आणि रस्त्यांच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

पाणी वाचवण्यासाठी महापालिकेचे नवे नियम

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने काही नियम निश्चित केले आहेत. पाणी कपातीच्या काळात स्वतःच्या बोअरवेल किंवा विहिरीतील पाणी वापरणाऱ्या वॉशिंग सेंटरना रविवार, मंगळवार आणि गुरुवार या तीन दिवशीच सुरू ठेवण्याची परवानगी असेल. बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकाम ठेकेदारांवर कारवाई केली जाऊ शकते. गरज पडल्यास संबंधित काम थांबवण्याचे निर्देशही दिले जाऊ शकतात. तसेच सोसायट्यांमधील बंद असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पुन्हा सुरू करण्यासाठी नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
पाण्याच्या गळतीवरही लक्ष
पाण्याच्या टाक्यांमधून पाणी वाहून जाऊ नये, यासाठी स्वयंचलित फ्लोट व्हॉल्व्ह बसवण्यावर महापालिका भर देणार आहे. जलवाहिन्यांमधील गळती वेळेत दुरुस्त करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रत्येक विभागात नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहेत.
नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई
अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी यासंदर्भात कार्यालयीन आदेश काढले आहेत. पाणीपुरवठा विभागासह क्षेत्रीय कार्यालये, उद्यान विभाग, बांधकाम विकास, भवन रचना आणि पथ विभागाला या आदेशानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
संबंधित विभागांना दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा लागणार आहे. या कामात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, पुणेकरांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. उपलब्ध पाणीसाठा वर्षभर पुरावा यासाठी पाण्याची बचत करणे गरजेचे असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
