पुणे- नगर रस्त्यावर आता वाहनांनी घेतला मोकळा श्वास!! वाहने धावू लागली सुसाट, वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल…

पुणे : पुणे शहरातील येरवडा परिसरातील नगर रस्त्यावर असलेला विमाननगर चौक वाहतूक पोलिसांनी सिग्नलमुक्त केला आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी चौकात बॅरिकेड लावून काही वाहनांना वळण दिल्यामुळे, वाहतूक सुरळीत झाली आहे.

नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गिका आणि विमाननगर फिनिक्स मॉल चौकात सिग्नलमुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी सोडवण्यासाठी माजी आमदार सुनील टिंगरे यांनी पाठपुरावा करून येरवडा पर्णकुटी ते सोमनाथनगर चौकापर्यंतची बीआरटी मार्गिका काढून टाकली.
रस्ता रुंद झाला, मात्र विमाननगर चौकात वाहतूक कोंडी सुटत नव्हती. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी चौकात बॅरिकेड लावून काही ठिकाणी वाहने वळवण्यास बंदी केली. विमाननगर चौकातून आणि नगर रस्त्याने येणाऱ्या वाहनांना विमाननगरकडे जाण्यासाठी लष्कराच्या अग्निबाण केंद्रासमोरून ‘यू टर्न देण्यात आला आहे.

दरम्यान, या उपाययोजनेमुळे, विमाननगर चौक वाहतूक कोंडीमुक्त झाला आहे. नगर रस्त्यावरील वाहने वेगाने धावू लागली असून, कोंडीतून नागरिकांची सुटका झाली आहे, असा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.