प्रियकराला घरी बोलावणं पडलं महागात! पती दोन तास आधी घरी आला अन् भयंकर घडलं; दीड लाखांच्या नोकरीसाठी हत्येचा कट


सोनभद्र : उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे विवाहबाह्य संबंधातून पतीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या प्रियकराला घरी पाहिल्यानंतर पतीने दोघांना जाब विचारला. त्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देत संपूर्ण घटना अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.

रामाशंकर मिश्रा हे शक्तीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिना कॉलनीमधील कंपनीच्या क्वार्टर्समध्ये पत्नी प्रियांका आणि दोन मुलींसह राहत होते. प्रियांका आणि विकास चौहान यांच्यात प्रेमसंबंध होते. रामाशंकर कामावर गेल्यानंतर विकास घरी येत असल्याचे तपासात समोर आले. रामाशंकर परत येण्यापूर्वी विकास घरातून निघून जात असे.

मात्र, 22 ऑगस्ट रोजी रामाशंकर नेहमीपेक्षा तब्बल दोन तास आधी घरी परतले. त्यावेळी त्यांनी प्रियांका आणि विकासला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचा पोलिसांचा दावा आहे. यामुळे घरात जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर प्रियांका आणि विकास यांनी रामाशंकर यांचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे.

हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विकासने त्याचे दोन साथीदार अनुराग सिंग उर्फ बादल आणि सोनू गुप्ता यांना बोलावले. चौघांनी रामाशंकर यांचा मृतदेह चादर आणि टॉवेलमध्ये गुंडाळला. त्यानंतर बिना स्टेडियम-जमशिला रस्त्याजवळ रस्त्याच्या कडेला मृतदेह फेकून देण्यात आला.

23 ऑगस्टला मृतदेह सापडला

23 ऑगस्ट रोजी रामाशंकर यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर बाबींमुळे पोलिसांना संशय आला.

रामाशंकर यांना सुमारे दीड लाख रुपये पगार होता. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, या उद्देशाने हत्येऐवजी अपघाती मृत्यूचा बनाव केल्याचा संशय तपासात पुढे आला.

पोलिसांनी प्रियांका, विकाससह संबंधितांची कसून चौकशी केली. चौकशीतील माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हत्येतील कथित भूमिका स्पष्ट झाल्यानंतर प्रियांका, विकास चौहान, अनुराग सिंग उर्फ बादल आणि सोनू गुप्ता या चौघांना अटक करण्यात आली. या हत्येचा नेमका कट कसा रचला गेला आणि प्रत्येक आरोपीची भूमिका काय होती, याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!