अखेर तो दिवस ठरला! ‘या’ तारखेपासून बीड-पुणे रेल्वे धावणार; बीडकरांना मोठा दिलासा

बीड : मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बीड-पुणे रेल्वे सेवेची प्रतीक्षा आता संपणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर २०२६ रोजी बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेसाठी आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यासोबतच डिसेंबर २०२६ अखेर बीड ते मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रेल्वे मार्गाच्या कामांचा आढावा


अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. यावेळी बीड-पुणे तसेच बीड-मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार होत्या.
रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक, प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
बीडला रेल्वे जोडणी मिळावी यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, असे सुनेत्रा पवार यांनी बैठकीत नमूद केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
४० वर्षांची प्रतीक्षा संपल्यानंतर आता पुण्याशी थेट जोडणी
बीडकरांची सुमारे चार दशकांची रेल्वेची प्रतीक्षा संपवत १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू झाली होती. आता याच दिवसाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर २०२६ रोजी बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.
या रेल्वे सेवेमुळे बीड जिल्ह्याचा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. त्याचा फायदा शिक्षण, व्यापार, उद्योग, शेती आणि रोजगाराच्या दृष्टीने होण्याची अपेक्षा आहे.
डिसेंबरअखेर मुंबई रेल्वेचे लक्ष्य
बीड-पुणे रेल्वेनंतर बीड-मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. डिसेंबर २०२६ अखेर ही सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी प्रत्येक कामाचा कालबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे जोडणीमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सोयीचा होण्यासोबतच वेळ आणि खर्चाची बचत होईल. त्यामुळे बीडच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
१७ सप्टेंबरच्या बीड-पुणे रेल्वेच्या शुभारंभासाठी आवश्यक नियोजन आणि समन्वयाने तयारी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बीड-पुणे आणि त्यानंतर बीड-मुंबई रेल्वे सेवा जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.