पुण्यात वैष्णवी प्रकरणाची पुनरावृत्ती ; 26 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

पुणे : सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे. परंतु आता वैष्णवीप्रमाणे पुण्यातील हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. 26 वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाच लाख रुपये आणि मोटारसायकल आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ केल्यामुळे बोऱ्हाडेवाडी येथील किरण दामोदर या 26 वर्षीय विवाहितहिने गळफास घेत आत्महत्या केली. अधीर या दीड वर्षांच्या मुलाला मागे ठेवून किरणने टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.किरणचा पती आशिष दामोदर तिला नेहमीच दारु पिऊन शिवीगाळ करत असे, तसेच मारहाण करत असल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर किरण दामोदर यांचे वडील – संजय दोंड यांच्या तक्रारीनंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी किरणचा पती आशिष दामोदर, सासरे दीपक दामोदर, सासू सुनंदा दामोदर यांच्यावर हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
