‘धमक्या दिल्या तर नेस्तनाबूत करून टाकू’; CM देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही मोठं वक्तव्य


मुंबई : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या काही वक्तव्यांवरून त्यांच्याविरोधात गुन्हेही दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत धमकी देणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.

श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 179 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी वारकरी परंपरा, सरला बेटाचा विकास आणि शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजनांबाबत भाष्य केले.

‘धमकी देण्याचं काम केलं तर नेस्तनाबूत करून टाकू’

रामगिरी महाराजांना मिळणाऱ्या धमक्यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्याकडे धमकी पाठवणाऱ्यांना सरकार सहन करणार नाही. धमकी देण्याचे काम करणाऱ्यांना कडक कारवाईचा इशारा देत त्यांनी रामगिरी महाराजांच्या सुरक्षेबाबत सरकार ठाम असल्याचे सांगितले.

सरला बेट महाराष्ट्रातील भाविकांसाठी उर्जेचं केंद्र होणार

सरला बेटावर सुरू असलेल्या विकासकामांचाही फडणवीस यांनी आढावा घेतला. बेटावर हॉल, रस्ते आणि पूर संरक्षणाची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील काळात सरला बेटाचा विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल. सरला बेट हे महाराष्ट्रातील भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र बनावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा उपक्रम’

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचीही माहिती दिली. आतापर्यंत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. दर पंधरा दिवसांनी नवीन यादी तयार करून पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासोबतच दिवसा वीजपुरवठा वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

वारकरी परंपरेचेही कौतुक

हरिनाम सप्ताहामुळे समाजातील सर्व घटक एकत्र येतात. वारकरी परंपरेने समाजाला एकत्र ठेवण्याचे काम केले असल्याचे फडणवीस म्हणाले.

संत परंपरा, हरिनाम आणि वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा कायम राहिली असल्याचे सांगत त्यांनी महंत रामगिरी महाराजांच्या कार्याचेही कौतुक केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!