पुणे जिल्ह्यात FDAची मोठी कारवाई! संशयित दूध, मसाले आणि अन्नसाठा जप्त; ‘मोरया मिसळ’चा परवाना निलंबित

पुणे : पुणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत अवमानक आणि असुरक्षित अन्नपदार्थांचा साठा, लेबलिंगमधील त्रुटी आणि परवान्याविना अन्न व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहेत. 21 ते 23 ऑगस्टदरम्यान झालेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात अन्नसाठा ताब्यात घेण्यात आला असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
इंदापूरमधील दूध प्रकल्पातून सुमारे 3,370 लिटर संशयित अवमानक गायीचे दूध जप्त करण्यात आले. या दुधाची किंमत सुमारे 1 लाख 31 हजार 560 रुपये असल्याची माहिती आहे. तर वारजे येथील ‘मोरया मिसळ’च्या तपासणीत कृत्रिम रंगाचा वापर आणि मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळल्याने आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.

इंदापुरात 3370 लिटर दूध जप्त
इंदापूर तालुक्यातील मौली मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स येथे गायीच्या दुधाच्या दोन टाक्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी 3,370 लिटर दूध आढळून आले. दुधाच्या आम्लता तपासणीत संशयास्पद निष्कर्ष आल्याने हे दूध अवमानक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर संबंधित साठ्यावर कारवाई करण्यात आली.


‘मोरया मिसळ’चा परवाना निलंबित
वारजे येथील मोरया मिसळची तपासणी केली असता खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंगाचा वापर आणि मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा आढळून आला. त्यामुळे अन्न प्रशासनाने संबंधित आस्थापनाचा परवाना निलंबित केला आहे.
मार्केट यार्डमध्ये मोठ्या साठ्यावर कारवाई
मार्केट यार्डातील धनश्री सेल्स येथे 10,200 किलो चणा आणि 33,600 किलो खारीकचा साठा आढळला. या खाद्यपदार्थांच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्याने ते अवमानक किंवा असुरक्षित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
याच परिसरातील लेकसिटी आस्थापनाकडे 8,158 किलो मोहरी, 5,638 किलो जवस आणि 3,196 किलो जिरे आढळले. मात्र, संबंधित आस्थापना आवश्यक परवान्याविना व्यवसाय करत असल्याचे तपासणीत समोर आले.
तसेच विक्रेता आणि वाहतूकदाराकडील 3,985.4 किलो सैल हरभऱ्यामध्ये बाह्य पदार्थ आढळल्याने त्यावरही कारवाई करण्यात आली.
खेडमध्येही संशयित साठा आढळला
खेड तालुक्यातील महालक्ष्मी महिला गृहउद्योग संस्थेकडे 778 किलो व्हाईट वाटाण्याचा साठा आढळून आला. हा साठाही अवमानक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि संबंधित नियमांनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे यासाठी जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रे, प्रक्रिया केंद्रे, अन्न विक्रेते आणि इतर व्यवसायांची तपासणी सुरूच राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.