ड्युटी एकत्र, राहणंही एकत्र अन् मैत्रीचं प्रेमात रूपांतर; दोन महिला पोलिसांनी ठरवलं लग्न, पण ऐनवेळी… पुण्यात खळबळ


पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत असलेल्या दोन महिला पोलिसांच्या विवाहाची सध्या चर्चा रंगली आहे. एकमेकींसोबत काम करताना दोघींची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाल्याची माहिती आहे.

दोघींनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असून, आळंदीत 30 ऑगस्ट रोजी विवाहसोहळा आयोजित करण्याची तयारी केली होती.मात्र, त्यांच्या विवाहाची माहिती सोशल मीडियावर चर्चेत आल्यानंतर दोघींनी विवाहसोहळा लांबणीवर टाकल्याची माहिती समोर येत आहे.

एकाच ठिकाणी ड्युटी, एकाच घरात राहण्याची वेळ

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला पोलिसांची पोलीस भरतीनंतर एकाच ठिकाणी नियुक्ती झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलीस मुख्यालयात काम करण्याची संधी मिळाली. त्या इतर महिला पोलिसांसोबत एकाच सदनिकेत राहत होत्या.

नंतर दोघींची शहरातील एका पोलीस ठाण्यात एकाच ठिकाणी नियुक्ती झाली. कालांतराने इतर महिला पोलिसांनी राहण्याचे ठिकाण बदलले. मात्र, या दोघी एकत्रच राहिल्या. याच काळात त्यांच्यातील जवळीक वाढल्याचे सांगितले जात आहे.

विवाहासाठी घेतली रजा

दोघींनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी आळंदीत विवाहसोहळा करण्याचे ठरवले होते. यासाठी त्यांनी रजेचा अर्जही केला होता. मात्र, सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर विवाहसोहळा पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, एका महिला पोलिसाच्या कुटुंबीयांचा या निर्णयाला विरोध असल्याचीही चर्चा आहे.

कायदा काय सांगतो?

भारतात समलैंगिक विवाहाला सध्या कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे दोन व्यक्ती एकत्र येऊन धार्मिक किंवा वैयक्तिक स्वरूपाचा सोहळा करू शकतात; मात्र अशा विवाहाची कायदेशीर पती-पत्नी म्हणून नोंदणी करता येत नाही, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी दिली आहे. दरम्यान, या दोन्ही महिला पोलिसांच्या प्रस्तावित विवाहाबाबत पोलीस विभागाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!