पुण्यातील बोपदेव घाटात काळाचा घाला! बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना टेम्पोने चिरडलं; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर


पुणे : पुण्यातील बोपदेव घाटात आज भीषण अपघाताची घटना घडली. घाटातून भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने बसची वाट पाहत बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोपदेव घाटातील एका वळणावर आयशर टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्टॉपवर जाऊन धडकला. त्यावेळी स्थानिक शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी बसची वाट पाहत थांबले होते. अचानक टेम्पो धडकल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला.

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीसही तातडीने दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीन विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. बोपदेव घाटातील वाढती वाहतूक आणि वाहनांचा अनियंत्रित वेग यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून आयशर टेम्पो चालकाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला की चालकाच्या निष्काळजीपणामुळे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!