वारं फिरलं! महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे बरसणार जोरदार? जाणून घ्या आजचं हवामान

पुणे : ऑगस्टच्या सुरुवातीपासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. अनेक भागांत पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, आता पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पाऊस पडला. दरम्यान, 25 ऑगस्ट रोजी राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 24 तासांसाठी राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणात पावसाची विश्रांती कायम
कोकण विभागात सध्या पावसाचा जोर तुलनेने कमी आहे. या भागासाठी कोणताही विशेष हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


पुढील चार ते पाच दिवस या भागात हवामान ढगाळ, कोरडे आणि दमट राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता कमी
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट नाही. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस या भागात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता कमी असून, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम राहण्याची शक्यता आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तर अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात ‘या’ चार जिल्ह्यांना यलो अलर्ट
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय काही भागांत 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मात्र, पावसाचा जोर सर्वत्र कायम नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अद्याप कायम आहे.
विदर्भातील चार जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट नाही. मात्र, पुढील एक ते दोन दिवसांत काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण
एकूणच राज्यातील हवामानात पुन्हा बदल होत असून पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता वाढली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.