साखर महागली पण तुटवडा नाही! दोन महिन्यांत 40% दरवाढीमागे नेमकं काय? धक्कादायक कारण समोर

पुणे : सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या चिंतेत भर पडली होती. काही दिवसांपूर्वी 40 ते 50 रुपये किलो असलेली साखर 100 रुपयांचा टप्पा ओलांडणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती.
मात्र, देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांना घाबरण्याचे कारण नसल्याचे समोर आले आहे. येत्या काही दिवसांत साखरेचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे देशात साखरेचा पुरेसा साठा असतानाही गेल्या दोन महिन्यांत दरात तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या दरवाढीमागे प्रत्यक्ष साखरेचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट होत आहे.


साखरेचे भाव वाढण्यामागे नेमकं कारण काय?
‘इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’चे (ISMA) अध्यक्ष नीरज शिरगावकर यांच्या म्हणण्यानुसार, व्यापाऱ्यांकडून करण्यात आलेली साठेबाजी आणि साखरेचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने मोठ्या ग्राहकांनी केलेली आगाऊ खरेदी यामुळे बाजारात कृत्रिम तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली.
जुलैमध्ये 48 रुपये किलो असलेली साखर ऑगस्टमध्ये 55 ते 56 रुपयांवर पोहोचली. विशेष म्हणजे ऑगस्टच्या सुरुवातीलाच देशात सुमारे साडेतीन महिन्यांचा साखरेचा साठा उपलब्ध होता.
मोठ्या ग्राहकांनी नेहमीच्या गरजेपेक्षा दीड ते दोन महिन्यांचा अतिरिक्त साठा करून ठेवला. त्याचवेळी व्यापाऱ्यांनीही साखर गोदामांमध्ये अडवून ठेवल्याने बाजारातील उपलब्धता कमी झाली आणि त्याचा थेट परिणाम दरांवर झाला.
यंदा साखरेचे उत्पादन किती?
यंदा देशात सुमारे 279 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. त्याच्या तुलनेत देशातील वार्षिक वापर 280 ते 285 लाख टनांच्या आसपास आहे. मागील वर्षी 261 लाख टन उत्पादन झाले होते. त्यामुळे यंदाचे उत्पादन तुलनेने अधिक आहे.
मात्र, ब्राझीलमधील घटलेले उत्पादन, महाराष्ट्रातील वाढलेले उसाचे गाळप आणि उत्तर प्रदेशातील पिकावर झालेल्या रोगाचा परिणाम यामुळे साखरेच्या बाजारात दरवाढीची भीती निर्माण झाली.
इथेनॉलसाठी किती साखर वळवली?
यंदा सुमारे 30 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवण्यात आली असून 8 लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. तरीही देशातील साखरेचा साठा पुरेसा असल्याचे ISMAकडून सांगण्यात आले आहे.
त्यामुळे नागरिकांनी घाबरून साखरेची अतिरिक्त खरेदी करू नये. साठा मुबलक असल्याने येत्या काही दिवसांत बाजारातील दर पुन्हा खाली येण्याची शक्यता असल्याचे संघटनेने म्हटले आहे.