महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला! भाजप, शिंदे गट, अजितदादा गटाच्या वाट्याला किती महामंडळे? ‘मास्टर प्लॅन’ समोर


मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्षे उलटली, तरी विविध महामंडळांवरील राजकीय नियुक्त्यांचा प्रश्न प्रलंबित होता. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

अखेर महामंडळ वाटपावरून महायुतीमध्ये सुरू असलेला तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. महामंडळांच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोमवारी (24 ऑगस्ट) महायुती समन्वय समितीची बैठक पार पडली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत महायुतीतील विविध मतभेदांवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन निधीच्या वाटपाचा आढावाही घेण्यात आला. याच बैठकीत महामंडळांच्या वाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेल्या महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील 15 दिवसांत महामंडळांवरील नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी अंतिम आराखडाही तयार करण्यात आला आहे.

महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 48 टक्के महामंडळे येणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 29 टक्के आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला 23 टक्के महामंडळे मिळणार आहेत.

पुढील 15 दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महामंडळांवरील सदस्यांच्या अंतिम यादीवर स्वाक्षरी केली जाण्याची शक्यता आहे.

अधिकृत घोषणा कधी होणार?

कोणते विशिष्ट महामंडळ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, याचा अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. यासाठी आणखी एक-दोन बैठका होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर संबंधित महामंडळांच्या वाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

महायुतीतील हा तिढा पूर्णपणे सुटल्यानंतर महामंडळांवरील राजकीय नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!