पुणेकरांनो लक्ष द्या! बुधवारी ईद-ए-मिलाद मिरवणुकीमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद


पुणे : पुणे शहरात बुधवारी (26 ऑगस्ट) ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. काही रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, काही मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्यांकडे वळवली जाणार आहे.

त्यामुळे बुधवारी घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक बदलांची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

कुठून निघणार मिरवणूक?

ईद-ए-मिलादची मिरवणूक नानापेठ येथील मनुशाह मशीद, 482 नानापेठ येथून सुरू होणार आहे. मिरवणूक संत कबीर चौक, ए.डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी, निशांत सिनेमा, भगवानदास चाळ, चुडामन तालीम आणि मुफ्ती फौज चौक मार्गे पुढे जाईल.

यानंतर सरदार पटेल रोड, कुरेशी मशीद, जान मोहम्मद स्ट्रीट, बाबाजान दर्गा, चारबावडी चौकी, फुलवाला गल्ली, सेंटर स्ट्रीट रोड, भोपळे चौक आणि 15 ऑगस्ट चौक असा मिरवणुकीचा मार्ग असेल.

पुढे एम.जी. रोड, महमद रफी चौक, कोहीनूर चौक, महावीर चौक, सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी चौक, सरबतवाला चौक आणि क्वार्टर गेटमार्गे मिरवणूक संत कबीर चौकाकडे येईल. त्यानंतर नाना चावडी चौक, अल्पना सिनेमा, हमजेखान चौक आणि गोविंद हलवाई चौकातून सुभानशाह दर्गा चौक गाठण्यात येईल. शुक्रवार पेठेतील सिटी जामा मशीद येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.

‘या’ रस्त्यांवर वाहतूक निर्बंध

रास्ता पेठ पॉवर हाऊस ते संत कबीर चौक या मार्गावर वाहतुकीला निर्बंध राहतील. या मार्गावरील वाहने समर्थ पोलीस स्टेशन आणि क्वार्टर गेटच्या दिशेने वळवली जातील.

क्वार्टर गेटहून येणाऱ्या वाहनांसाठी सायकल कॉलनी, समर्थ पोलीस स्टेशन, रास्ता पेठ, पॉवर हाऊस, के.ई.एम. हॉस्पिटल आणि अपोलो सिनेमा हा पर्यायी मार्ग उपलब्ध असेल.

नाना पेठेतून लक्ष्मी रोडकडे जाणारी वाहने नाना चावडी चौकातून रास्ता पेठ-पॉवर हाऊसच्या दिशेने वळवली जातील. पद्मजी चौकी ते ए.डी. कॅम्प चौक या मार्गावरील वाहतूक क्वार्टर गेट आणि जुना मोटार स्टँडकडे वळवण्यात येणार आहे.

कॅम्प वाय जंक्शनवरून एम.जी. रोडकडे जाणाऱ्या वाहनांना खाणे मारुती चौकाच्या दिशेने वळवण्यात येईल. इस्कॉन मंदिर चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवरच्या दिशेने जाणारी वाहतूक परिस्थितीनुसार सकाळी 9 वाजल्यानंतर थांबवली जाऊ शकते.

मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मशीदकडे जाणारी वाहने चुडामन तालीममार्गे वळवण्यात येतील. व्होल्गा चौकातून महमद रफी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना ईस्ट स्ट्रीट रोडमार्गे इंदिरा गांधी चौकाचा पर्यायी मार्ग दिला जाईल.

महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एम.जी. रोडमार्गे नाझ चौकाचा मार्ग उपलब्ध राहणार आहे.

100 मीटर परिसरात पार्किंगला बंदी

मिरवणुकीच्या मार्गावर तसेच जोडरस्त्यांच्या प्रवेशद्वारापासून 100 मीटरच्या परिसरात वाहन पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बुधवारी मिरवणुकीचा मार्ग शक्यतो टाळावा आणि पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक विभागाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!