54 सरकारी वेबसाइट्सवरील सायबर हल्ल्याने खळबळ; तपासाचे धागे पुण्याच्या जुन्नरपर्यंत, आर्थिक व्यवहारांचं गूढ उलगडणार?

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात केंद्र सरकारच्या 54 महत्त्वाच्या अधिकृत संकेतस्थळांवर DDoS (डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस) सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत असून, तपासाचे धागेदोरे आता पुणे जिल्ह्यातील जुन्नरपर्यंत पोहोचले आहेत.
24 ऑगस्ट रोजी NIAने देशातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत मोठी शोधमोहीम राबवली. याच कारवाईदरम्यान जुन्नरमधील तांदूळ बाजार परिसरात राहणाऱ्या दोन स्थानिक नागरिकांना तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही व्यक्तींच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत NIAकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यक्तींचा सायबर हल्ल्याशी नेमका काय संबंध आहे, याचा तपास यंत्रणेकडून शोध घेतला जात आहे.


दरम्यान, या कारवाईसंदर्भात जुन्नर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
लॅपटॉप, मोबाईलसह डिजिटल पुरावे जप्त
NIAच्या या देशव्यापी कारवाईत 3 लॅपटॉप, 5 मोबाईल फोन आणि अन्य डिजिटल साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, यापैकी नेमके कोणते साहित्य जुन्नरमधून जप्त करण्यात आले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
NIAच्या पुढील तपासाकडे लक्ष
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन व्यक्तींचा केंद्र सरकारच्या संकेतस्थळांवरील DDoS हल्ल्याच्या प्रयत्नाशी थेट संबंध आहे का? त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा संबंध कोणाशी आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे NIAच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहेत.