सत्याचा अन न्यायाचा अखेर विजय……’, महाराष्ट्र सदन प्रकरणात दोषमुक्त झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे ईडीकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर छगन भुजबळ यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, गेल्या काही अनेक वर्षात आम्ही न्याय प्रक्रियेवर संपूर्ण विश्वास ठेवून संयमाने वाट पाहिली. अखेर सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला आहे.. या काळात माझ्या कुटुंबाने, सहकाऱ्यांनी आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. यापुढील काळातही अधिक जोमाने जनतेच्या सेवेसाठी आम्ही सगळेच काम करत राहू असे छगन भुजबळ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाममध्ये अफराथपर केल्याचा आरोप करण्यात आला होता.याप्रकरणी भुजबळ दोन वर्षे जेलमध्ये देखील होते. या प्रकरणात भुजबळ यांच्यासह एकूण 46 जणांवर आरोप होते, ज्यात ठेकेदार आणि अधिकारी सामील होते. या आरोपांमुळे भुजबळ यांची प्रतिमा डागाळली.हा घोटाळा अंदाजे 850 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत गुन्हा देखील नोंदवला. त्यानुसार, बांधकामाच्या कंत्राटात नियम मोडले गेले आणि पैसे चुकीच्या पद्धतीने वापरले गेले असा दावा होता. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीनेही यात हात घातला आणि मनी लॉन्डरिंगचा मुद्दा उपस्थित केला. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आणि भुजबळ यांना तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र हे प्रकरण दीर्घकाळ चालले आणि अनेक तपास यंत्रणांनी याची चौकशी केली.
अखेर मुंबईतील विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह 46 जणांना दोषमुक्त केले. न्यायालयाने म्हटले की, एसीबी प्रकरणात दोषमुक्ती मिळाल्याने ईडीचे प्रकरण टिकू शकत नाही. पुरावा अपुरा असल्याचे सिद्ध झाले यामुळे भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
