लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई! ऑनलाइन ‘कल्याण मटका’ रॅकेटचा पर्दाफाश; दोघे ताब्यात


लोणी काळभोर : लोणी काळभोर परिसरात सुरू असलेल्या ऑनलाइन ‘कल्याण मटका’ जुगारावर लोणी काळभोर पोलिसांच्या तपास पथकाने सोमवारी (ता. ३) छापा टाकला आहे. पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.

आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता व्हॉट्सअॅपवर मटक्याच्या चिठ्ठ्या, आकडे, ऑनलाइन पैशांच्या देवाण-घेवाणीचे संदेश आणि क्यूआर कोडद्वारे व्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे हडपसरपर्यंत पोहोचल्याने पोलिसांनी आणखी एका संशयिताचा शोध सुरू केला आहे.

स्वप्नील शांतराम भालेराव (वय 29, रा, लोणी काळाभोर ता. हवेली, जि. पुणे) व मयूर गोपीचंद बडदे (वय २४, रा. अंबरनाथ मंदिराजवळ, लोणी काळभोर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन भिमराव सोनवणे यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार अण्णा माने, पोलीस हवालदार कोल्हे आणि इतर कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना बौद्धवस्ती परिसरात एका व्यक्तीकडून मोबाईलवर ऑनलाइन ‘कल्याण मटका’ जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानंतर पोलिसांनी आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी छापा टाकला. पंचांसमक्ष केलेल्या कारवाईत स्वप्नील भालेराव हा मोबाईलवर ऑनलाइन ‘कल्याण मटका’ स्वीकारताना आढळून आला.

त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो जुगाराची माहिती मयूर बडदे याच्याकडे पाठवत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मयूर बडदे याच्याकडे चौकशी केली असता, तो मिळालेली माहिती पुढे सूरज कांजणे (रा. हडपसर) याला मोबाईलद्वारे पाठवत असल्याची माहिती उघड झाली.

दोन्ही आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता व्हॉट्सअॅपवर मटक्याच्या चिठ्ठ्यांचे फोटो, आकडे, ऑनलाइन पैशांच्या व्यवहाराचे संदेश तसेच स्कॅनर (क्यूआर कोड) द्वारे पैसे स्वीकारल्याचे पुरावे आढळून आले. यावरून ऑनलाइन माध्यमातून ‘कल्याण मटका’ जुगाराचे जाळे चालविले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडील मोबाईल जप्त करून पुढील तपास सुरू केला असून, हडपसर येथील संशयितासह या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!