पंधरा वर्षानंतर ‘यशवंत’ च्या थकीत शेतकऱ्यांची ऊसबिले वाटप करण्यास सुरुवात; १४ कोटी रुपये रक्कम थकीत शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार वर्ग; संचालक मंडळाचा निर्णय…

उरुळीकांचन : यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी स्व. अजित पवार यांनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात येत असून कारखान्यासाठी प्रलंबित असलेल्या जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक पाठपुरावा सुरू ठेवला असून भविष्यात कारखाना सुरू होईल यात शंका नसून पंधरा वर्षानंतर कारखाना सुरू होण्यासाठी तालुक्याने यातना सहन केल्यामुळे शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे अदा करताना ‘एका डोळ्यांत दु:ख तर एका डोळ्यात आनंद असल्याची भावना आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी व्यक्त केली आहे.

थेऊर (ता.हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सन २००९ -२००१० तर २०११ -२०१२ या गळीत हंगामाच्या उसाचे रुपये १२४० प्र.मे.टन तत्कालीन एफआरपी दराने ३,९५३ सभासद शेतकऱ्यांचे थकीत १४ कोटी ७ लाख १४ हजार ६५९ रुपये रक्कम अदा करण्याची कार्यवाही संचालक मंडळाने सुरू केली आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून स्वखुशीने तत्कालीन एफआरपी नुसार थकित शेतकऱ्यांना धनादेशा स्वरुपात थकीत रक्कमेचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या रक्कमेला आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पाच शेतकऱ्यांना प्रातधिनिक स्वरूपात धनादेश अर्पण करण्याचा कार्यक्रमात आ. ज्ञानेश्वर कटके बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप,पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप उपाध्यक्ष रत्नाबाई काळभोर, संचालक प्रताप गायकवाड, माजी संचालक बाळासाहेब चौधरी, संचालक संतोष कांचन,किशोर उंद्रे,राहुल घुले,सुनील कांचन यांच्यासह सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.

दरम्यान संचालक मंडळाने एकरकमी परतफेड योजनेतून सर्व वित्तीय संस्थांची देणी केवळ ३६ कोटी रुपये इतक्या थकीत कर्जात भागवून संस्था नव्याने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापैकी थकीत शेतकऱ्यांचा गळीत हंगाम सन २००९-१० व १०-११ या गळीत हंगामातील थकीत रक्कम अदा भाग म्हणून २००९-१० गळीत हंगामाचे ९९९रु. प्र.मे.टन १६७४ शेतकऱ्यांचे देय उस बिल ४,२२,२४११४ रुपये, तर सन २०१०-११ गळीत हंगामाचे कालावधीतील देय उसबील रुपये १२४० प्र.मे.टन या दराने २६३२ शेतकऱ्यांचे एकूण रुपये ८,९२,०१२३९ रुपये तसेच सन २०१०-११ गळीत हंगामात संपूर्ण सीझनमध्ये गाळपास आलेल्या उसाचे रुपये ४० प्र.मे.टन या दराने ३९५३ शेतकऱ्यांचे ९२,८९,३०६ रुपये अशी तीनही ऊस बिलांची एकूण थकबाकी १४ कोटी ७ लाख १४ हजार ६५९ रुपये रक्कम अदा करण्यास सुरुवात झाली आहे.

” यशवंत सहकारी साखर कारखाना पुढील गळीत हंगामात सुरू करण्याचा प्रयत्न असून संचालक मंडळ उपलब्ध झालेल्या भांडवलातून केवळ संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भागभांडवल थकीत देणीभागवून संस्थेच्या पायाभरणीसाठी आवश्यक अर्थिक खर्चाच्या बाबी पूर्ण करुन कारखाना सुस्थितीत चालू होईल यासाठी दक्षता घेणार आहे”
सुभाष जगताप -अध्यक्ष , श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना.
