शरद पवारांच्या पक्षात मोठी उलथापालथ! सर्व प्रवक्त्यांची पदं रद्द; तातडीच्या आदेशाने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने महत्त्वाचा संघटनात्मक निर्णय घेतला आहे. पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या असून, पुढील आदेश येईपर्यंत महेश तपासे आणि माजी आमदार विद्या चव्हाण हेच पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडणार आहेत.
हा निर्णय पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने घेण्यात आला असून, त्याबाबतची अधिकृत माहिती पक्षाने सोशल मीडियावरील अधिकृत पोस्टद्वारे जाहीर केली आहे. या निर्णयानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

पक्षाची अधिकृत घोषणा
पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, 4 ऑगस्ट 2026 पासून यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहेत. या कालावधीत केवळ विद्या चव्हाण आणि महेश तपासे हेच अधिकृत प्रवक्ते म्हणून माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडतील.


निर्णयामागे काय कारण?
या निर्णयामागील नेमके कारण पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, अलीकडच्या काळात पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू असताना हा निर्णय घेण्यात आल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
दरम्यान, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही पडद्यामागे काही राजकीय घडामोडी सुरू असल्याच्या चर्चांमुळे या निर्णयाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे.
आता पक्षाने सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करून केवळ दोनच अधिकृत प्रवक्त्यांकडे माध्यमांशी संवादाची जबाबदारी दिल्याने, आगामी काळात पक्षाच्या राजकीय रणनीतीत काही महत्त्वाचे बदल होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.