पत्नीला म्हणाला ‘माझं अपहरण झालंय’… पोलिसांसमोर पोहोचताच सगळं उघड! पुण्याच्या व्यावसायिकाचा ‘किडनॅपिंग’ ड्रामा; मैत्रिणीसोबतची गुप्त ट्रिप पडली महागात


मुंबई : पत्नीला आपण व्यवसायाच्या कामानिमित्त परदेशात जात असल्याचं सांगायचं, मात्र प्रत्यक्षात मैत्रिणीसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी निघायचं आणि विमानतळावरच सगळा प्लॅन फसल्यावर स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचायचा… पुण्यातील एका ४६ वर्षीय व्यावसायिकाचा हा प्रकार सध्या चर्चेत आला आहे. पत्नीने पती बेपत्ता असल्याची आणि त्याचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर तपास सुरू झाला आणि काही तासांतच या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य समोर आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिक पुण्यात लॉन्ड्रीचा व्यवसाय करतो. १४ सप्टेंबर रोजी तो एका महिला मैत्रिणीसोबत मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे जाण्याच्या तयारीत होता. मात्र, घरी त्याने ही व्यवसायाची सहल असल्याचं सांगितलं होतं. दोघेही मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर इमिग्रेशन तपासणीदरम्यान त्याच्या महिला मैत्रिणीच्या कागदपत्रांमध्ये अडचण निर्माण झाली.

महिलेने यापूर्वी आपला पासपोर्ट हरवल्याची तक्रार केली होती. मात्र, प्रवासासाठी ती जुना पासपोर्ट घेऊन आल्याचं तपासात समोर आलं. इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच तिची चौकशी करण्यात आली. त्यामुळे दोघांनाही नियोजित परदेशवारी पुढे नेता आली नाही आणि क्वालालंपूरचा प्लॅन विमानतळावरच फसला.

याच क्षणी व्यावसायिकासमोर पत्नीला खरी परिस्थिती सांगण्याचं संकट उभं राहिलं. मात्र, सत्य सांगण्याऐवजी त्याने वेगळीच कहाणी रचल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. त्याने स्वतःचा मोबाईल बंद केला आणि विमानतळावरील लँडलाइनवरून पत्नीला फोन केला. इमिग्रेशनच्या अडचणीमुळे आपला मोबाईल जमा करून घेतल्याचं त्याने पत्नीला सांगितलं.

यानंतर तो महिला मैत्रिणीसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे गेला. दुसऱ्या दिवशीही त्याने पत्नीशी अत्यंत कमी संवाद साधला. इमिग्रेशनच्या अडचणीचीच माहिती देत त्याने पत्नीला पुन्हा विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र त्याचा मोबाईल पूर्णपणे बंद झाला.

पतीशी बराच वेळ संपर्क होत नसल्याने पत्नीची चिंता वाढली. अखेर बुधवारी तिने थेट सहार पोलिस ठाणे गाठलं आणि पतीचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. पती नेमका कुठे गेला, विमानतळावर काय घडलं आणि त्याचा मोबाईल का बंद आहे, याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

तपासाची चक्रे फिरत असतानाच या कथेला अनपेक्षित वळण मिळालं. संबंधित व्यावसायिक स्वतःच सहार पोलिस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्याने पत्नीला सांगितलेली इमिग्रेशनची कहाणी खरी नसल्याचं समोर आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नीपासून महिला मैत्रिणीसोबतची ट्रिप आणि त्यांच्यातील संबंध लपवण्यासाठी त्याने बेपत्ता होण्याचा बनाव रचला होता.

अशाप्रकारे पत्नीला काळजीत टाकणारा ‘किडनॅपिंग’चा दावा अखेर खोटा ठरला. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, तपासानंतर न्यायालयात ‘सी समरी’ अहवाल सादर करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!