मोठी बातमी! अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण मिळणार? आमदार विक्रम काकडेंची अमित शाह यांच्याकडे मागणी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन अधिकृत निवेदन सादर केले.

काकडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार यांचे गेल्या चार दशकांतील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. आमदार, खासदार आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी अर्थ व नियोजन, जलसंधारण, ऊर्जा, ग्रामीण विकास, कृषी यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये उल्लेखनीय काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात अनेक विकासकामे व लोककल्याणकारी प्रकल्प राबविण्यात आले.


त्वरित निर्णयक्षमता, प्रशासकीय अनुभव आणि विकासाभिमुख कामांमुळे अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारने त्यांना देशातील दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करावे, अशी मागणी विक्रम काकडे यांनी केली आहे.
यासंदर्भातील निवेदन त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सुपूर्द केले असून, या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंतीही केली आहे.