तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या खामगाव टेकच्या आजीचा अखेर लागला शोध; पुणे रेल्वे स्थानकावर भामट्या दाम्पत्याने चहातून गुंगीचे औषध पाजून दागिने केले लंपास


उरुळी कांचन : पुणे रेल्वे स्थानकावर देवदर्शन करून परतणाऱ्या खामगाव टेक (ता. हवेली) येथील 75 वर्षीय मंडाबाई बापू गडदे यांना लक्ष्य करून एका भामट्या नवविवाहित जोडप्याने धक्कादायक प्रकार केला. गोड बोलून विश्वास संपादन केल्यानंतर चहामध्ये गुंगीचे औषध देत त्यांच्या अंगावरील व कानातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

गोड बोलून जाळ्यात ओढले

माहितीनुसार, मंडाबाई गडदे या 28 जुलै रोजी देवदर्शनासाठी गेल्या होत्या. 30 जुलै रोजी सायंकाळी त्या पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. त्यांनी नातसून प्रणाली गडदे यांना फोन करून, “मी उरुळी कांचनला येणाऱ्या ट्रेनने घरी येत आहे, मला घ्यायला या,” असे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांचा मोबाईल अचानक बंद झाला.

रेल्वेची वाट पाहत असताना एका नवविवाहित जोडप्याने त्यांच्याशी ओळख वाढवत संवाद सुरू केला. काही वेळाने त्या व्यक्तीने चहा पिण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला मंडाबाईंनी नकार दिला, मात्र सोबतच्या महिलेने वारंवार आग्रह केल्याने त्यांनी चहाचा घोट घेतला.

चहात गुंगीचे औषध, दागिने लंपास

चहामध्ये गुंगीचे औषध मिसळल्यामुळे काही क्षणांतच मंडाबाईंना चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या. याच संधीचा फायदा घेत आरोपी दाम्पत्याने त्यांच्या अंगावरील आणि कानातील सोन्याचे दागिने काढून घटनास्थळावरून पलायन केले.

तीन दिवस शुद्धीवरच आल्या नाहीत

स्थानकावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या मंडाबाईंना काही नागरिकांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. चहातील औषधाचा परिणाम इतका तीव्र होता की त्या तब्बल तीन दिवस अर्धबेशुद्ध अवस्थेत होत्या. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

कुटुंबीयांचा जीव टांगणीला

दरम्यान, मंडाबाई बेपत्ता झाल्याने कुटुंबीय आणि उरुळी कांचन पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. नातू तेजस गडदे पुणे स्टेशन परिसरात शोध घेत असताना एका प्रत्यक्षदर्शी महिलेने संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर ससून रुग्णालयात चौकशी केली असता, मंडाबाईंना उपचारानंतर सोडल्याची माहिती मिळाली.

रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मंडाबाई पीएमपीएमएल बसने हडपसरला गेल्या. तेथून रेल्वेने त्या रात्री उरुळी कांचन स्थानकावर पोहोचल्या. स्थानकावर त्यांची वाट पाहत उभ्या असलेल्या कुटुंबीयांनी त्यांना सुखरूप पाहताच सुटकेचा नि:श्वास सोडला.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणात उरुळी कांचन पोलीस तपास करत असून, रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी नवविवाहित दाम्पत्याचा शोध घेतला जात आहे. तसेच प्रवाशांनी अनोळखी व्यक्तींकडून खाण्यापिण्याच्या वस्तू स्वीकारू नयेत, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!