शाळेत जाताना घडलं विपरीत, वडिलांसह २ चिमुकल्यांचा अंत, पुण्यातील दुःखद घटनेने सगळे हळहळले…

पुणे : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. याच दरम्यान पुण्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. एका भरधाव ट्रकने एका व्यक्तीसह त्यांच्या दोन लहान मुलांना चिरडले आहे.
शिक्रापूर येथे ही हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतलं आहे.
या अपघातात मृत पावलेल्या वडिलांचं नाव गणेश खेडकर आहे. तर तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर असे मृत पावलेल्या दोन चिमुकल्यांची नावं आहेत. सोमवारी सकाळी गणेश खेडकर हे आपल्या दोन्ही मुलांना दुचाकीवर घेऊन शाळेत सोडायला जात होता.
चाकण शिक्रापूर महामार्गावरून जात असताना झालेल्या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले आहे. ट्रक चालवत असताना चालकाने मद्यप्राशन केले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या अपघाताची घटना घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक सेवा ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.