मोठी घटना! पुणे स्थानकावर वंदे भारत घसरली; रेल्वे वाहतूक विस्कळीत


पुणे : वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी सायंकाळी पुणे स्थानकावर प्रवेश करताना रुळावरून घसरल्याने मोठी खळबळ उडाली. मुंबईहून सोलापूरकडे जाणारी ही गाडी फलाट क्रमांक ३ वर येत असताना सायंकाळी सुमारे ७:३० वाजता हा प्रकार घडला.

गाडी क्रमांक २२२२५ मधील ‘सी-१५’ (C-15) या डब्याची पुढील चाके ‘डायमंड क्रॉसिंग’जवळ रुळावरून खाली उतरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र स्वयंचलित दरवाजे अचानक बंद झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. सुमारे सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास संबंधित डबा पुन्हा रुळावर आणण्यात आला आणि गाडी यार्डात हलवण्यात आली. यासाठी जेसीबीसह तांत्रिक यंत्रणांचा वापर करण्यात आला.

दरम्यान, सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने पर्यायी गाडीची व्यवस्था केली. या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोलापूरहून मुंबईकडे धावणारी परतीची वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

या घटनेमुळे पुणे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस यांसारख्या गाड्यांना विलंब झाला. परिणामी, शेकडो प्रवासी स्थानकावर अडकून पडले.

वाढत्या उकाड्यात योग्य माहिती व उद्घोषणा न मिळाल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांना ऐनवेळी गाड्या रद्द किंवा उशिरा धावल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!