केडगाव – सुपे राज्य मार्गावरील चौफुला येथील कालव्यावरील पूल आणि पडवी – सुपे घाट रस्त्याच्या कामांसाठी आमदार राहुल कुल यांची मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा..

दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघातील केडगाव ते सुपे राज्य मार्ग क्र. ११८ वरील बोरीपार्धी – चौफुला येथील कालव्यावर नवीन मोठा पूल बांधावा आणि पडवी – सुपे दरम्यान घाट रस्त्याची सुधारणा करावी, अशी मागणी आमदार ॲड. राहुल कुल यांनी केली आहे. यासाठी त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेतली. या दोन्ही कामांबाबत त्यांनी लेखी निवेदन दिले.

केडगाव – सुपे राज्य मार्ग हा दौंड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर बोरीपार्धी – चौफुला येथे नवीन मुठा उजव्या कालव्यावर सध्या ३ गाळ्यांचा पूल आहे. हा पूल अतिशय अरुंद असल्याने दोन जड वाहने एकाच वेळी त्यावरून जाऊ शकत नाहीत.
परिणामी येथे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते आणि अपघात घडतात. पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वर हडपसर ते यवत उन्नत महामार्ग प्रस्तावित आहे. त्याचे काम सुरू झाल्यानंतर महामार्गावरील सर्व वाहतूक या राज्य मार्गावर वळवली जाणार आहे. त्यामुळे या पुलाचे रुंदीकरण करून येथे नवीन मोठा पूल उभारणे गरजेचे असल्याचे आमदार कुल यांनी निवेदनात नमूद केले आहे.


याच मार्गावरील पडवी ते सुपे दरम्यानच्या घाटात तीव्र चढ-उतार आणि धोकादायक वळणे आहेत. वळणांवर रस्त्याचा आवश्यक उतार (सुपर एलिव्हेशन) पुरेसा नाही. त्यामुळे चढ चढताना जड वाहने मागे घसरतात. काही वाहने विरुद्ध लेनमध्ये जाऊन चढण्याचा प्रयत्न करतात आणि समोरासमोर अपघात होतात. तीव्र वळणांवर चालकांचा ताबा सुटून वाहने थेट दरीत कोसळल्याच्या शेकडो घटना येथे घडल्या आहेत. त्यामुळे आवश्यक भूसंपादन आणि घाट कटिंग करून या रस्त्याची रचना आणि चढाची तीव्रता (ग्रेडियंट) सुधारण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी आमदार कुल यांनी केली.
या दोन्ही मागण्यांबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“केडगाव–सुपे मार्गावरील चौफुला पूल आणि पडवी–सुपे घाट हे दोन्ही ठिकाणी नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. उन्नत महामार्गाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक आणखी वाढणार आहे. त्यामुळे ही कामे लवकरात लवकर मंजूर होऊन मार्गी लागावीत, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे,” असे आमदार राहुल कुल यांनी या वेळी सांगितले.
