संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना! घरी सोडण्याचा बहाणा करून रिक्षाचालकाने विवाहितेला निर्जनस्थळी नेलं अन्…


छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरी सोडण्याच्या बहाण्याने एका रिक्षाचालकाने विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सोमवारी रात्री संबंधित ३० वर्षीय महिलेचा तिच्या पतीसोबत काही कारणावरून वाद झाला. या वादानंतर ती रागाच्या भरात घराबाहेर पडली. रात्रीची वेळ असल्याने कुठे जायचे, हे तिला समजत नव्हते. त्यामुळे ती एका ठिकाणी बसली होती.

याच दरम्यान एका रिक्षाचालकाने तिच्याजवळ येऊन विचारपूस केली. महिलेचा पतीसोबत वाद झाल्याचे समजल्यानंतर त्याने तिला घरी सुरक्षित सोडण्याचे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिला रिक्षात बसली.

निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप

मात्र, रिक्षाचालकाने महिलेला घरी सोडण्याऐवजी वैजापूर तालुक्यातील जांबरगाव परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. तेथे मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याने महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी महिलेला तिथेच सोडून पळून गेला.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

या घटनेनंतर पीडित महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पीडितेने दिलेले रिक्षा आणि चालकाचे वर्णन याआधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!