एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट! १ मेपासून नवे नियम लागू, जाणून घ्या सविस्तर माहिती…

पुणे : एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. येत्या १ मे पासून हे नवीन नियम देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी लागू होणार आहेत. नव्या नियमानुसार आता सिलेंडर वितरणावेळी ओटीपी अनिवार्य करण्यात आला आहे. ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी डिलिव्हरी एजंटला सांगावा लागणार आहे.

अनुदानित सिलेंडर योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत आणि गैरवापर रोखता यावा, यासाठी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने एलपीजी सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्येही बदल केला आहे. शहरी भागांमध्ये पूर्वी असलेलं २१ दिवसांचं बुकिंग अंतर आता २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.
तर ग्रामीण भागांमध्ये हे अंतर ४५ दिवसांपर्यंत ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे ग्राहकांना आता रिफिलचे नियोजन अधिक काळजीपूर्वक करावे लागणार आहे. पुरवठा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि अनावश्यक बुकिंग टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड आधारित ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलं आहे. ज्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी हा नियम लागू असेल. ज्यांनी आधीच ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांना पुन्हा करण्याची गरज नाही. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी एकदा ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे.

दरम्यान, सरकारने अलीकडेच एलपीजी दरात वाढ केली असून देशभरात घरगुती सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरातही वेळोवेळी वाढ नोंदवली गेली आहे. इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएलकडून पुरवठा व खर्चाचा आढावा घेतला जाणार असून, १ मे पासून आणखी दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.